03 December 2020

News Flash

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका..

‘आमच्या बापाने चूक केली, तुम्ही करू नका..’ अशी भावनिक साद घालत दुष्काळग्रस्त गावात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या सहभागाने शुक्रवारी बळीराजा प्रबोधन

| January 10, 2015 07:49 am

‘आमच्या बापाने चूक केली, तुम्ही करू नका..’ अशी भावनिक साद घालत दुष्काळग्रस्त गावात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या सहभागाने शुक्रवारी बळीराजा प्रबोधन दिंडीला सुरुवात झाली. मुंडन केलेल्या डोक्यावर गांधीटोपी, शेतकरी बांधवांच्या पेहेरावात प्रबोधन करणाऱ्या या अनाथ बालकांना पाहून समितीतील शेतकरीच नव्हे तर, व्यापारी व नागरिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सोशल नेटवर्किंग फोरम आणि आधारतीर्थ आधाराश्रमाने जनजागृतीसाठी दिंडीची संकल्पना मांडली. पुढील चार दिवस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका असे आवाहन करणार आहेत.

काही वर्षांत विदर्भ-मराठवाडय़ासोबत उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. निसर्गाची अवकृपा, शेतमालास मिळणारा अल्पभाव, नकली बियाणे, रोगांचा वाढता प्रादुर्भाव, जमिनीची घसरणारी प्रत, पाण्याचा अभाव किंवा जास्त पाणी अशा विविध कारणांमुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. आत्महत्येनंतर मिळणारी सरकारी मदत किंवा एखादे पॅकेज त्याच्या जगण्याची गरज पूर्ण करू शकत नाही. त्यांच्या जाण्याने कुटुंबाचे काय, त्यांच्या चिमुकल्याचे काय याचा सारासारविचार कुठेच होत नाही. या मुलांकडे पाहिल्यावर वडिलांनी परिस्थितीला तोंड देत त्यांच्या डोक्यावर सावली धरण्याऐवजी त्यांना उन्हात टाकून किती मोठी चूक केली हे लक्षात येते. हा विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड आणि आधारतीर्थचे संस्थापक त्र्यंबकराव गायकवाड यांनी प्रबोधन दिंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतून िदडीला सुरुवात झाली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ५० मुले दिंडीत सहभागी झाली आहेत. वडिलांचे छत्र हरपलेली ही मुले आधारतीर्थमध्ये वास्तव्यास आहेत. मुंडन केलेल्या डोक्यावर गांधीटोपी घातलेली बालके बाजार समितीत शेतकऱ्यांना कधी आत्महत्येसारखे पाऊल उचलू नका असा संदेश देत होते. अतिशय भावनिक वातावरणात दिंडीला सुरुवात झाली. त्यांचे बोल ऐकताना शेतीमाल विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांना अश्रू रोखता आले नाही.
सद्यस्थितीत अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. त्याला गरज आहे मानसिक धीर देण्याची, त्यांची िहमत वाढविण्याची. त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करून अडचणीच्या काळात त्याला मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. आत्महत्या पर्याय नसून संघर्ष करणे गरजेचे असल्याची जाणीव या बालकांनी करून दिली. आधारतीर्थ आश्रमातील मुलांकडे पाहून आपल्या मुलांच्या आयुष्यातील बापाची गरज शेतकऱ्यांच्या नक्की लक्षात येईल. बळीराजाने आपल्या मनात घोळत असलेल्या अशा विचाराला आवर घालावा हे या दिंडीचे प्रयोजन असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले पुढील चार दिवसात नाशिक येथून निफाड, येवला, वैजापूर, औरंगाबाद, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, जामनेर, भुसावळ, शेगाव या मार्गे विविध दुष्काळग्रस्त गावात प्रबोधन करणार आहेत. दिंडीत सहभागी होण्यासाठी प्रमोद गायकवाड (९४२२७६९३६४) आणि त्र्यंबक गायकवाड (९४२०३९७६७२) यांच्याशी संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 7:49 am

Web Title: farmers suicide in nashik
Next Stories
1 शेतकऱ्यांना एकरी साडे दहा लाख रुपये
2 नाशिक पालिकेसमोर कामगारांचा घंटानाद
3 सिंहस्थासाठी नवीन शाही मार्ग
Just Now!
X