फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेली गारपीट व अवकाळी पाऊस यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून ३२ कोटीचा निधी प्राप्त झाल्याची माहिती आ. दादा भुसे यांनी दिली.
गारपीट व पावसामुळे कांदा, डाळिंब, द्राक्ष, मका, हरभरा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. भुसे यांच्या नेतृत्वाखाली येथे सर्वपक्षीय धरणे आंदोलनही करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा करून मदत मिळण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवला होता. त्यानुसार यापूर्वी प्राप्त झालेला १५ कोटीचा मदतनिधी तालुक्यातील २४ गावांमधील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला आहे.
  आता ऊर्वरित ३२ कोटीचा निधीदेखील प्राप्त झाला असून सुमारे ५६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते क्रमांक अद्याप महसूल खात्याकडे कळविले नसतील त्यांनी त्वरीत कळविण्याचे आवाहन भुसे यांनी केले आहे.