गेल्या काही दिवसांपासून कृषी विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांना सत्ताबाह्य़ केंद्रामुळे मोठय़ा अडचणीचा सामना करावा लागत आहे. एका समितीचे उपप्रमुख म्हणून आलेल्या एका माजी निवृत्त अधिकाऱ्याने विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरले आहे. तसेच विद्यापीठातील काही गोपनीय माहिती, आकडेवारी व अहवालाचा वापर एका अहवालासाठी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व प्रकारामुळे अधिकारी व कर्मचारी चांगलेच धास्तावलेले आहेत.
राज्यातील सर्व भागांचा समतोल आर्थिक विकास करण्यासाठी व विकासाचे मापबिंदू ठरविण्यासाठी एका समितीची स्थापना राज्य सरकारने केली होती. या समितीच्या एका विषयाची जबाबदारी असलेले माजी अधिकाऱ्याने त्यांचा एक उपअहवाल समितीला व शासनाला सादर करायचा आहे. यासाठी कृषी विद्यापीठातील काही गोपनीय माहिती, आकडेवारी व अहवालांचे चौर्यकर्म होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यातील असमतोल विकासावर अहवाल लिहिणे तसे कठीण काम आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चौर्यकर्मातून अहवाल लिहण्याचे कसब दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व कामासाठी विद्यापीठाच्या काही उपकृत कर्मचाऱ्यांचा लाभ या माजी अधिकाऱ्यामार्फत घेण्यात येत आहे.
विद्यापीठ प्रशासनाने अशा प्रकारे अधिकृतपणे या अधिकाऱ्याला मदत करण्याची लेखी परवानगी संबंधितांना दिली नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमार्फत विद्यापीठाची गोपनीय माहिती, अहवाल व आकडेवारी संबंधिताला विनापरवानगी देण्याचा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार एका चौर्यकर्माचा भाग असल्याचा दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. एखाद्या विषयावर अहवाल तयार करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती विद्यापीठातील विविध विभागामार्फत काही वर्षांच्या अथक प्रयत्नांतून व मोठा पैसा खर्च करुन तयार होते. ती माहिती विद्यापीठाची असल्याने त्यांचे या माहिती स्वामित्व असायला पाहिजे. पण, या माहितीचा वापर संबंधीत माजी अधिकारी त्यांच्या वैयक्तिक अहवालासाठी करणार असल्याची माहिती मिळाली.
विद्यापीठाच्या माहिती, अहवाल व आकडेवारी यावरुन तयार होणाऱ्या या अहवालावर संबंधित अधिकाऱ्याचे नाव कोरले जाण्याची भीती काहींनी व्यक्त केली. अहवाल तयार करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित सदस्याची असून त्यासाठी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा व उपकरणांचा वापर योग्य की अयोग्य हा वादाचा विषय ठरु शकतो, असे मत अनेकांनी व्यक्त केले. विद्यापीठाच्या माहितीचे चौर्यकर्म थांबविण्यासाठी वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली.     
गोठणगावची खोड जिरवली..
थंडीमुळे गारठलेल्या गोठणगाव येथील वातावरण गेल्या काही दिवसांपुर्वी चांगलेच तापले होते. विद्यापीठाच्या माजी अधिकाऱ्याकडे पाणी भरणाऱ्यांना सहा कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी सबळ पुराव्यानिशी पकडले. त्यांच्या या कृष्णकृत्यांवर पांघरुण घालण्यासाठी आवाज चढविणाऱ्या माजी अधिकाऱ्यांची खोड मोडण्याचे धाडसी काम विद्यापीठाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केल्याची माहिती मिळाली. या वरिष्ठ अधिकाऱ्याने माजी अधिकाऱ्याला खडसावल्याचे वृत्त आहे. त्यामुळे निवृत्त अधिकाऱ्याचा व पाणी भरणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. विद्यापीठाच्या अधिकाऱ्याच्या या धाडसी कारवाईमुळे त्यांची विद्यापीठात सर्वत्र प्रशंसा होत आहे. तर गोठणगावची खोड कशी जिरवली अशी जोरदार चर्चा विद्यापीठात आहे.