अन्न व ऊर्जा हे दोन गंभीर प्रश्न जगासमोर आहेत. त्यावर मात करण्याची क्षमता केवळ भारताच्या कृषी व त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगात आहे. मात्र, यासाठी दर्जा आणि उपलब्धतेवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नॅचरल शुगर अ‍ॅण्ड अलाइड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक बी. बी. ठोंबरे यांनी केले.
लघुउद्योग भारतीच्या वतीने अन्न व फळ प्रक्रिया उद्योगांवर आधारित चर्चासत्र इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्स सभागृहात आयोजित करण्यात आले. त्याच्या समारोपप्रसंगी ठोंबरे बोलत होते. डॉ. शिवाजीराव शिंदे, पुणे फळे-भाजीपाला महासंघाचे प्रमुख बी. के. माने, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक ब्रिजेंद्रकुमार आदी उपस्थित होते. ठोंबरे म्हणाले की, जगातील प्रचलित ऊर्जेचे स्रोत संपल्यानंतर काय स्थिती ओढवेल, या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर भारताच्या शेती उद्योगात आहे. देश आज १२० कोटी लोकांना अन्न पुरवून ५२ देशांना निर्यातही करतो आहे. रिन्युएबल एनर्जीचे सारे स्रोत शेती उत्पादनांवरच आधारित आहेत. इथेनॉल, बायोगॅस, बायोडिझेल अशी अनेक उत्पादने आहेत. भारतीय शेतीत खूप मोठी क्षमता असूनही आपण त्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊ शकलो नाही. कारण शेतीला कधी उद्योग समजलाच नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शेतीसाठी अर्थसंकल्पात सातत्याने अतिशय कमी तरतूद करण्यात आल्याने शेतीचा म्हणावा तसा विकास झाला नाही. मराठवाडय़ात अनेक प्रकारची फळे उपलब्ध आहेत. परंतु त्यावर प्रक्रिया करणारा एकही उद्योग नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सेंद्रिय उत्पादनांना सर्वत्र मोठी मागणी आहे. त्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळायला हवे. बाजारपेठेच्या गरजांचा विचार करून उच्च दर्जाची उत्पादने घेणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि ती बाजारपेठेत आणणे आवश्यक आहे.
एसबीआयचे ब्रिजेंद्रकुमार यांनी बँकेमार्फत उद्योगांना देण्यात येणाऱ्या कर्जयोजनांची माहिती देऊन याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कृषी आधारित उद्योगांना कर्जपुरवठय़ाबाबत बँकेची भूमिका सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. लघुउद्योग भारतीचे देवगिरी प्रांताचे अध्यक्ष विजय हुलसूरकर यांनी लघुउद्योग भारतीची कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन साह्य़ देण्याची, या क्षेत्रात काम करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. चर्चासत्रात ११० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.