महावितरणच्या हलगर्जिपणामुळे आज तालुक्यातील नायगाव येथे एकाचा बळी गेला. शेतात उसाची लागण करताना विजेच्या खांबात उतरलेल्या वीजप्रवहाचा धक्का लागून आदिवासी समाजाच्या अनिल अंकुश गायकवाड (वय २८) या शेजमजुराचा जागीच मृत्यू झाला.
बाबासाहेब दादासाहेब इंगळे यांच्या शेतात काल बुधवारी सकाळपासन ऊस लागणीचे काम सुरू होते. दिवसभर ऊस तोडल्यानंतर रात्री उशिरा टिपरे दाबण्यास अनिल गायकवाड व त्यांच्या टोळीतील सहकाऱ्यांनी प्रारंभ केला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अनिल गायकवाड शेतातील वीज खांबाजवळ आले. दरम्यान या खांबास जोडलेल्या आर्थिगच्या तारेत व खांबात विजप्रवाह उतरलेला होता. शिवाय लागणीसाठी शेतात पाणी सोडले असल्यामुळे गायकवाड यांचा खांबास स्पर्ष होताच त्यांना जोराचा झटका बसला. ते जोराने जमिनीवर आदळन मृत्यूमुखी पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने शहरातील कामगार रूग्णालयात हलविले. परंत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फ़ौजदार इकबाल शेख, उत्तम भोसले, पोलीस कर्मचारी किरण बनसोडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी अंकुश सखाराम गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलीसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
मयत गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची असन महावितरणच्या हलगर्जिपणामुळेच हा मृत्यू झाला असून महावितरणने त्यांच्या कटुंबियांना भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.