गेल्या तीन वर्षांपासून विदर्भासह जिल्ह्य़ातील शेतकरी कोरडय़ा व ओल्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. असे असतांना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील महावितरण कंपनीने थकित बिलापोटी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा विद्युत पुरवठा कापण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार असून तो आत्महत्येसाठी प्रवृत्त होणार आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा कापण्याच्या प्रकारासह थकित वसुली थांबवावी अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी दिला आहे.  
दै.लोकसत्ताशी बोलतांना ते म्हणाले की, कधी कोरडय़ा, तर कधी ओल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी पाऊस पाणी चांगले असल्याने खरिपाची पिके चांगली आली आहेत. मात्र, गेल्या पंधरा दिवसात पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांना खरिप पिकांसाठी तुषार जलसिंचन करावे लागत आहे. शेतकऱ्यांची ही निकड लक्षात घेता महावितरण कंपनीने त्यांच्यावर वसुलीचा बडगा उगारला आहे. थकित विद्युत बिलापोटी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांच्या जोडण्या तोडण्याचा चुकीचा प्रकार महावितरणने चालविला आहे. त्यामुळे खरिप पिके उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार आहे. वीज जोडण्या कापणे काम महावितरणने त्वरित थांबवावे अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. एखाद्या भागातील रोहित्र जळाल्यास ते २४ तासात सुरू करावे अन्यथा, प्रती तास ५० रुपये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, असा नियम आहे. परंतु, आज जिल्ह्य़ात कितीतरी दिवसांपासून अनेक रोहित्रे बंद आहेत. असे असतांना वीज कंपनीने किती शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली? पाणीटंचाईच्या काळात अनेक धरणे व प्रकल्पावरील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कापले आहेत. अद्यापही हे कनेक्शन जोडलेले नाहीत. तरी शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीज बिले येत आहेत.
सध्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे त्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह करावा की वीज बिल भरावे, असा प्रश्न आहे. शेतकऱ्यांची हेळसांड थांबविण्यासाठी ही पठाणी वसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.
महावितरणकडून बडय़ा उद्योगांना थकित विद्युत बिलापोटी सवलती देण्यात येतात.
मात्र, येथे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. २००३ च्या विद्युत कायद्यानुसार शेतकऱ्यांना पूर्वसूचना व नोटीस दिल्याशिवाय जोडण्या तोडू नयेत मात्र, या कायद्याचे महावितरण उल्लंघन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांचा पुळका आत्ताच का?
इतके दिवस कुंभकर्णी झोपा काढणाऱ्या खासदार प्रतापराव जाधव यांना जशी जशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसा तसा शेतकऱ्यांचा पुळका येऊ लागला, असा आरोप त्यांचे विरोधक असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांनी केला आहे.