अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमधील कामगारांनी आपल्या न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी कंपनीच्या व्यवस्थापना विरोधात गेल्या तीन महिन्यांपासून नांदाफाटा येथे साखळी उपोषण सुरू केले. तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू होते.
या आंदोलनाची व्यवस्थापनाने तीळमात्र दखल घेतली नाही. जिल्हा प्रशासनाने या न्यायसंगत आंदोलनाबद्दल किंचितही सहानुभूतीदर्शक कृती केली नाही. एवढेच नाही, तर खोटी तक्रार करून पोलिसांकरवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष शिवचंद काळे यांना अटक करून तुरुंगात डांबले आहे. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या या दंडुकेशाही, मनमानी व अडेलतट्ट धोरणाचे विरोधात कामगारांनी आंदोलन अधिक तीव्र केले. या जिल्ह्य़ातील विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन सर्वशक्तीनिशी आंदोलन तीव्र करण्याचा दृढसंकल्प केला व चंद्रपूर जिल्हा मजदूर काँग्रेसच्या वतीने येथील स्थानिक गांधी चौकात ९ मार्चपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. ११ मार्च हा उपोषणाचा तिसरा दिवस होता. सकाळी १० वाजता बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभाचे पदाधिकारी या साखळी उपोषणाला बसले. यात कोषाध्यक्ष रामदास वाग्दरकर, सहसचिव एन. सत्यनारायण, अनिल तुंगीडवार, हेमंत दातारकर यांचा समावेश आहे. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी उपोषणकर्त्यांचे पुष्पहाराने स्वागत केले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, जिल्हा काँग्रेसचे महासचिव अ‍ॅड. अविनाश ठावरी, नगरसेवक अशोक नागापुरे, सुधाकरसिंह गौर, अरुण बुरडकर, बाबूलाल करुणाकर, अनंता हुड, सुधाकर पोटदुखे, आर. एल. राजूरकर, प्रकाश लोनकर, राजू बुरिले व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.