तालुक्यात अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांची भरती प्रक्रियेचे आयोजन होऊन महिना होत आला तरी निवड झालेल्या महिलांना शासन चौकशीच्या नावाखाली नियुक्तीपत्र देण्यास विलंब करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ तसेच निवड झालेल्या महिलांना विनाविलंब नियुक्तीपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी या सर्व अन्यायग्रस्तांनी २० मेपासून नाशिक येथे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे इगतपुरीतील अंगणवाडी भरती प्रक्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांसाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या वतीने दोन मार्च रोजी भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते.
ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्यांना निवडीचे पत्र देण्यात आले होते. परंतु या भरती प्रक्रियेला आक्षेप घेतला गेल्याने भरतीत निवड झालेल्या शेकडो महिलांचे भवितव्य अंधारात आले आहे. भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत या प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी तीन महिने उलटूनही चौकशी पूर्ण होत नसल्याने निवड झालेल्या महिला संतप्त झाल्या आहेत.