23 January 2021

News Flash

न्यायासाठी पित्याची एकहाती लढाई

तीन वर्षांपूर्वी शाळेतून परतत असताना भरधाव ट्रकखाली चिरडून मृत्युमुखी पडलेल्या आपल्या चार वर्षांच्या मुलीला न्याय मिळवून देतच तिच्यावर जे बेतले ते इतर कुठल्याही लहानग्यांवर बेतू

| July 30, 2015 12:06 pm

तीन वर्षांपूर्वी शाळेतून परतत असताना भरधाव ट्रकखाली चिरडून मृत्युमुखी पडलेल्या आपल्या चार वर्षांच्या मुलीला न्याय मिळवून देतच तिच्यावर जे बेतले ते इतर कुठल्याही लहानग्यांवर बेतू नये यासाठी हेमंत बिन्नानी या पित्याची एकहाती लढाई सुरू आहे. शाळेच्या परिसरातच भरधाव ट्रकखाली आपल्या मुलीला चिरडणाऱ्या आरोपीला आता गजाआड होताना पाहणे आणि कायदेशीर लढाई जिंकून मुलीला न्याय मिळवून देणे हेच बिन्नानी यांचे एकमेव ध्येय बनलेले आहे.
चर्चगेट येथील प्राप्तिकर विभागाच्या मुख्यालयासमोरील रस्त्यावर तीन वर्षांपूर्वी ट्रकखाली चिरडून बिन्नानी यांची चार वर्षांची मुलगी काव्या हिचा मृत्यू झाला. शाळा सुटल्यानंतर आई अलकासोबत घरी परतत असताना काव्याला भरधाव येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने चिरडले. काव्याला आधी जवळच असलेल्या दवाखान्यात नेण्यात आले व नंतर तिला बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र दाखल करून घेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
बेदरकार व निष्काळजीपणे ट्रक चालवून चिमुरडय़ा काव्याला चिरडणाऱ्या संजय दहाय या चालकावर सध्या महनगर दंडाधिकाऱ्यांसमोर खटला चालविण्यात येत आहे. काहीच दिवसांत त्याचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू होऊन प्रकरण अंतिम टप्प्यात पोहचेल आणि खटल्याचा निकाल येईल. परंतु येथे पोहोचण्यासाठी बिन्नानी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. दहाय याला अपघातानंतर लगेचच अटक करण्यात आली. मात्र जामिनावर सुटका झाल्यावर तो येथून पळून गेला. त्याला शोधण्यासाठी ट्रकच्या मालकाने बिन्नानी यांना मदत केली. परंतु मध्य प्रदेश येथील गावी दहाय सापडला नाही. परंतु त्याने हताश न होता बिन्नानी यांनी त्याला शोधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. त्यांनी त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आणि त्याच्या शोधकामात मदत करण्याचे आवाहन केले. त्याच वेळी आझाद मैदान पोलिसांच्या संपर्कात राहून प्रकरणाचा पाठपुरावाही सुरूच ठेवला. सहा महिन्यांपूर्वी अखेर दहाय याला मध्य प्रदेशातील त्याच्या गावातूनच अटक करण्यात आली. याशिवाय त्याच्याकडे बनावट चालक परवाना असल्याचेही उघड झाले आहे.
प्रत्येक सुनावणीच्या वेळी आरोपीला पाहिल्यावर कायद्याने त्याला शिक्षा होण्याची वाट पाहण्याशिवाय आपण काहीच करू शकत नसल्याची खंत आणि हतबलता आपल्याला सतावते, असे बिन्नानी खिन्नपणे सांगतात. पण आपली ही लढाई एवढय़ापुरतीच मर्यादित नाही, तर अशा प्रकारच्या अपघातांचा चालकांवर फारसा काही फरक पडत नाही. त्यामुळे आपली ही कायदेशीर लढाई महत्त्वाची ठरावी आणि बेदरकार व निष्काळजीपणे गाडी चालविणाऱ्या चालकांना त्यातून धडा मिळावा यासाठी हा खटाटोप करत असल्याचे बिन्नानी यांचे म्हणणे आहे. शिवाय आपल्या मुलीसोबत जे झाले त्याची अन्य विद्यार्थ्यांबाबत पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपण शाळेच्या परिसरातील रस्त्यांवर गतीरोधकासाठी प्रयत्न केले. वाहतूक पोलिसांनी त्याची दखल घेत तसेच विशेष परवानगी घेऊन या रस्त्यांवर गतिरोधक करण्यात आले आहेत. शिवाय सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली आहे, असेही बिन्नानी यांनी सांगितले.
काव्याच्या आठवणी सांगताना बिन्नानी यांना भावना अनावर होतात. वेळेपूर्वीच काव्याचा जन्म झाला. त्यामुळे तिच्या विकासाची गती मंद राहील असे अनेकांचे म्हणणे होते. उलट काव्या प्रत्येक गोष्ट अगदी पटकन आत्मसात करायची. पूर्वप्राथमिक शाळेतच तिने खेळात आणि अन्य उपक्रमांमध्ये बक्षिसे मिळवली, असे ते आवर्जून सांगतात. खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला आपण जातीने हजर असतो. पत्नी अलका मात्र केवळ साक्ष देण्यासाठी न्यायालयात आली होती. परंतु तिने त्यापासून दूरच राहावे, असेच आपल्याला वाटते. शिवाय आमची दोन वर्षांची मुलगी सिद्धी हिलाही तिला सांभाळायचे असते. काव्याच्या मृत्यूनंतर लगेचच सिद्धीचा जन्म झाला. परंतु काव्याची पोकळी अद्याप भरलेली नाही, असे बिन्नानी सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 12:06 pm

Web Title: father handedly fighting for justice
टॅग Justice
Next Stories
1 प्रतिपूर्ती व शिष्यवृत्ती योजना
2 धोरण दिरंगाई गोविंदांच्या पथ्यावर!
3 शाळेच्या दुरुस्तीवर कोटय़वधी रुपये खर्चूनही विद्यार्थी ‘शाळाबाह्य़’
Just Now!
X