मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी वर्षभराच्या कालावधीनंतर तिचा गळफास देऊन खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी शहरातील गंगापूररोड परिसरात घडली. विशेष म्हणजे ही मुलगी गर्भवती होती. संशयितास अटक करण्यात आली असून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पंचवटीतील मोरेमळा परिसरात एकनाथ किसन कुंभारकर हे राहतात. त्यांच्या प्रमिला या मुलीने वर्षभरापूर्वी दीपक कांबळे यांच्याशी प्रेमविवाह केला. ती सातपूरजवळील कामगारनगर मध्ये राहावयास गेली. या विवाहास कुंभारकर यांचा विरोध होता. या विवाहापासून प्रमिला आणि कुंभारकर यांचे संबंध कमालीचे बिघडले होते. प्रमिलाचे वडिलांकडे येणेजाणे बंद झाले होते, असेही सांगण्यात येते. वर्षभरानंतर अचानक अलीकडे कुंभारकर यांना प्रमिला बाजारात दिसली. प्रमिला गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर ते अधिकच संतप्त झाले. शुक्रवारी सकाळीच त्यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या एका रिक्षावाल्यास उठवून भावाची प्रकृती बिघडल्याने त्यास पाहावयास जाण्याचे कारण सांगत कामगारनगरमधील प्रमिलाचे घर गाठले. प्रमिलाला आईची तब्येत बिघडली असून घरी चल असे सांगितले. त्यानंतर रिक्षातून ते परतत असताना गंगापूररोड परिसरातील एका ठिकाणी रिक्षा थांबवून कुंभारकर यांनी रिक्षा चालकास दुकानातून वस्तू आणावयास सांगितले. चालक रिक्षातून उतरताच संधी साधून कुंभारकर यांनी आपल्या बरोबर आणलेल्या दोरीने प्रमिलाचा गळा आवळला. प्रमिला हालचाल करीत नसल्याचे लक्षात आल्यावर ते पळून गेले.
रिक्षा चालकाने या प्रकाराची माहिती सरकारवाडा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी कुंभारकर यास ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.