जिल्ह्यातील धरणांवर स्वयंचलीत पाणी पातळीदर्शक यंत्रणा, स्वयंचलीत र्पजन्यमापक केंद्र तर नद्यांमध्ये प्रवाहाच्या मोजमापासाठी सरीता मापन केंद्र, अशा साधनांनी गोदावरी खोऱ्यातील पूर पूर्वानुमानासाठी अत्याधुनिक व्यवस्था कार्यान्वित केली गेली असली तरी यंदाच्या पावसाळ्यात तिची उपयुक्तता सिद्ध होईल की नाही, याकडे सर्वाचे लक्ष आहे. गतवर्षी पावसाअभावी या यंत्रणेचा फारसा उपयोग झाला नाही. पाणलोट क्षेत्रातील पाऊस व धरणांची जलपातळी याबाबत माहिती लघुसंदेशाद्वारे भ्रमणध्वनीवर प्रत्येक तासाला देण्याची क्षमता असणारी ही यंत्रणा सध्या काही तांत्रिक कारणास्तव अधुनमधून गटांगळ्या खात आहे.
पूर नियंत्रण कामात पारदर्शकता आणण्यासह नागरिकांनाही सजग राखण्याच्या दृष्टिकोनातून या यंत्रणेसाठी तीन वर्षांपूर्वी चार कोटी रूपये खर्च करण्यात आले. पूर नियंत्रणात काटेकोरपणा आणण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या व्यवस्थेचा नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनाही लाभ होऊ शकतो. २००८ मध्ये गोदावरीच्या महापुरामुळे शहर व परिसराला बिकट स्थितीचा सामना करावा लागला होता. महापुराच्या चौकशीत त्याचा ठपका पालिकेवर येऊनही या यंत्रणेची कार्यशैली बदलल्याचे दिसले नाही. गोदावरीसह शहरातून वाहणाऱ्या अन्य नद्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरक्षित राखण्याच्या उद्देशाने प्रदीर्घ काळापासून चर्चेत राहिलेली पूररेषा महापुरानंतर प्रत्यक्षात अवतरली. मात्र, त्या अनुषंगाने नदीकाठावरील बांधकामांवर आलेल्या र्निबधामुळे सत्ताधारी मनसेकडून आजही ही पूररेषा चुकीची असल्याची तक्रार केली जात आहे. महापुरानंतर मूळ समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा शोधण्यात पालिका हलगर्जीपणा करत असताना दुसरीकडे धरणांमधून पाणी सोडण्याचे दायित्व ज्या घटकावर आहे, त्या पाटबंधारे विभागाने मात्र भविष्यात गोदावरी खोऱ्यात पुरामुळे आपत्कालीन संकटांचा सामना करावा लागू नये म्हणून या व्यवस्थेद्वारे तीन वर्षांपूर्वी मैलाचा टप्पा गाठला.
या अंतर्गत संपूर्ण खोऱ्यातील धरणांवर स्वयंचलीत पाणी पातळीदर्शक यंत्रणा, र्पजन्यमापक केंद्र तर नद्यांमध्ये प्रवाहाच्या मोजमापासाठी सरीता मापन केंद्रांची उभारणी करण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेली ‘अ‍ॅक्वास्कॅन’ पद्धतीची ही सर्व उपकरणे आहेत. त्यांच्यामार्फत स्वयंचलीत पद्धतीने संकलीत माहिती उपग्रहाच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या मुख्यालयात नियंत्रण कक्षास प्राप्त होते. नोंद झाल्याक्षणी आलेली ही माहिती पुढे लघु संदेशाद्वारे पाटबंधारे विभाग, जिल्हा प्रशासन व महापालिकेतील अधिकाऱ्यांना पाठविली जाते. पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना धरणातून पाणी सोडताना त्याचा प्रामुख्याने उपयोग होतो. या यंत्रणेद्वारे प्रत्येक धरणात पुढील काही तासात येणाऱ्या पाण्याची माहिती चार ते वीस तास आधीच समजते. त्यामुळे धरणांच्या दरवाजांमधून आवश्यक तेवढा पाण्याचा विसर्ग नदीत सोडणे शक्य होऊन संभाव्य पुराने नदीकाठावर कमीतकमी हानी होईल याची दक्षता घेणे शक्य आहे.
गतवर्षी या यंत्रणेचा दारणा धरण वगळता फारसा वापर होऊ शकला नाही. मागील वर्षी पावसाअभावी दारणा धरण वगळता जिल्ह्यातील एकही धरण भरले नव्हते. दारणा धरणातून पाणी सोडताना या व्यवस्थेचा उपयोग झाल्याची माहिती या विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के यांनी दिली. त्यामागे २०११ मध्ये या यंत्रणेची उपयुक्तता लक्षात आली होती. पावसाने अद्याप जोर पकडला नसला तरी ही यंत्रणा नेहमीप्रमाणे सुरू झाली आहे. सद्यस्थितीत पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस व धरणातील जलसाठा याची माहिती लघुसंदेशाद्वारे दिली जाते. नियमितपणे हे लघुसंदेश प्राप्त होत असले तरी कधीकधी काही तांत्रिक कारणास्तव ते विलंबाने प्राप्त होतात. आदल्या दिवशी नियंत्रण कक्षातून पाठविला गेलेला लघुसंदेश पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना दुसऱ्या दिवशी प्राप्त झाला. या अडखळत पद्धतीने ही यंत्रणा कार्यान्वित राहिल्यास अतिवृष्टिच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

संपूर्ण जिल्ह्यत असलेली व्यवस्था
गंगापूर प्रकल्प समुहातील काश्यपी, आळंदी, गंगापूर, गौतमी-गोदावरी तर दारणा प्रकल्प समुहातील भावली, मुकणे, कडवा, भोजापूर, दारणा, वालदेवी या धरणांमध्ये जलाशय पातळीदर्शक उपकरणे बसविण्यात आली आहेत. तसेच या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तसेच नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर, वाघेरा, अंजनेरी, घोटी अशा एकूण १९ ठिकाणी स्वयंचलीत र्पजमापन केंद्र बसविले जात आहे. नदीच्या पातळीची माहिती घेण्याकरिता आळंदी नदीवर जलालपूर शिवारात, गोदावरी नदीवर होळकर पूल, किकवी नदीवर बेजे, वक्ती नदीवर हिरडी गावांजवळ, वाकी नदीवर धरणाच्या खालील बाजूस आणि दारणा नदीवर नाशिक-सिन्नर रस्त्यावरील पूल या ठिकाणी सरीता मापन केंद्र बसवली गेली आहेत. माहिती संकलित करण्यासाठी लाभक्षेत्र विकास नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात संगणकीकृत पूर नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील मोठय़ा, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या वतीने पूर नियंत्रण आणि नदीकाठावरील पूर स्थिती हाताळण्याचे काम केले जाते. ही यंत्रणा कार्यान्वित होण्यापूर्वी त्या-त्या भागातील कर्मचाऱ्यांमार्फत उपरोक्त माहिती संकलनाचे काम केले जात होते. अतिदुर्गम भागातील माहिती संकलीत करण्यास अडचणी येत असल्याने आणि ती विलंबाने प्राप्त होत असल्याने पूर नियंत्रणासाठी धरणांच्या दरवाजांचे परिचालन करणे, पूरप्रभावित गावांना सूचना देणे या कामांना विलंब होत असल्याचे लक्षात आले होते. या नव्या उपकरणांच्या माध्यमातून ही त्रुटी भरून निघाली आहे.