चिखल, रेती, पाण्यामुळे तांत्रिक बिघाड होत असल्याचे निष्पन्न
 * प्लास्टिक नेण्यास बंदी ’ इमर्जन्सी बटन दाबल्यास जिने बंद  ’ बेशिस्त वापरामुळे प्रशासन हैराण
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी बसविण्यात आलेल्या सरकत्या जिन्यांना पाणी, प्लास्टिक, चिखल आणि मातीचे वावडे असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. ठाण्यासारख्या अतिशय गर्दीच्या रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेले हे जिने येथील गर्दीचा भार पेलू शकतील का, असा सवाल सुरुवातीपासूनच उपस्थित केला जात होता. सरकत्या जिन्यांवरून पादचारी पूल गाठण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असली तरी पावसाळ्यात चिखल, पाण्यामुळे जिने वारंवार बंद होत असल्याच्या तक्रारी आता अभियांत्रिकी विभागाकडून पुढे येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे, जिन्यांच्या प्रवेशद्वाराजवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी बसविण्यात आलेले ‘इमरजन्सी बटन’ प्रवाशांकडून वारंवार दाबले जात असल्यामुळे जिने बंद पडण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.
मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानक ओळखले जाते. रेल्वे प्रशासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालानुसार या स्थानकात दररोज सुमारे सहा लाख ४४ हजार प्रवाशांचा वावर असतो. त्यामुळे ठाणे स्थानकात पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे प्रयत्न सुरू केले आहेत.
१२ मीटर रुंदीच्या पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून सहा मीटर रुंदीच्या आणखी दोन पुलांची उभारणी केली जाणार आहे. त्याचबरोबर तीन-चार क्रमांकाच्या फलाटावर सरकते जिने कार्यान्वित करण्यात आले असून पाच-सहा क्रमांकावर येत्या दीड महिन्यांत अशाच स्वरूपाचे जिने कार्यान्वित केले जाणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील आणखी काही स्थानकांवरही हा प्रयोग अमलात आणला जाणार आहे.
संमिश्र यश
दरम्यान, ठाणे स्थानकात बसविण्यात आलेल्या सरकत्या जिन्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तीन आणि चार फलाटावर आदळणाऱ्या गर्दीच्या लोंढय़ांचा भार पेलण्यात काही प्रमाणात या जिन्यांना यश आले असले तरी हे यश संमिश्र स्वरूपाचे आहे. जिने कार्यान्वित केल्यानंतर काही तासांत त्यामध्ये रेती गेल्यामुळे बंद पडले होते. पावसाचे पाणी, चिखल, प्लास्टिकच्या पिशव्या अडकल्यामुळे जिने बंद पडल्याच्या घटना गेल्या तीन दिवसांमध्ये घडल्या आहेत. काही प्रवाशांनी सरकत्या जिन्यांवर पाण्याने भरलेल्या बाटल्या उपडय़ा केल्याचे प्रकारही घडले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना जिने बंद करता यावेत, यासाठी प्रवेशद्वाराजवळ इमरजन्सी बटन ठेवण्यात आले आहे. काही प्रवाशांनी कळ दाबल्यामुळे जिने बंद पडल्याचे प्रकार घडले आहेत. अशा वेळी केबिनमध्ये जाऊन पुन्हा एकदा जिने सुरू करावे लागतात, अशी माहिती या ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकाने दिली. सरकता जिना पादचारी पुलास जेथे जोडला गेला आहे तेथे छप्पर नाही. त्यामुळे मुसळधार पावसाचे पाणी जिन्यांवर येते आणि तांत्रिक बिघाडामुळे ते बंद पडतात, असे प्रकारही घडले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने या जिन्यांवर चिखल, पाणी, प्लास्टिकच्या पिशव्या, रेती घेऊन जाऊ नये, असे आवाहन केले आहे. प्रवाशांचा त्यास किती प्रतिसाद लाभतो यावर या जिन्यांचे भवितव्य अवलंबून आहे.