26 September 2020

News Flash

पावसाळ्यात धान्याची सुरक्षितता; ‘एफसीआय’कडून विशेष दक्षता

पावसाळ्यात बाजारपेठांमध्ये उघडय़ावर ठेवलेल्या धान्याची मोठय़ा प्रमाणात नासाडी होत असताना धान्याच्या सुरक्षिततेसाठी भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) नागपूर कार्यालयाने विशेष दक्षता घेतली आहे. एफसीआयच्या नागपूर विभागाची

| June 27, 2013 03:08 am

पावसाळ्यात बाजारपेठांमध्ये उघडय़ावर ठेवलेल्या धान्याची मोठय़ा प्रमाणात नासाडी होत असताना धान्याच्या सुरक्षिततेसाठी भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) नागपूर कार्यालयाने विशेष दक्षता घेतली आहे. एफसीआयच्या नागपूर विभागाची धान्य साठा क्षमता साडेपाच लाख मेट्रिक टनापर्यंत वाढविण्यात आली आहे. पाऊस, आग, कीड आदी कारणांमुळे होत असलेली धान्याची नासाडी थांबविण्यासाठी विशेष विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे.
एफसीआयचे नागपुरात विदर्भ विभागीय कार्यालय आहे. विदर्भात नागपूरसह २९ ठिकाणी एफसीआयची गोदामे असून एकूण धान्य साठा करण्याची क्षमता साडेपाच लाख मेट्रिक टन एवढी असून ४ लाख, ६० हजार मेट्रिक टन धान्या साठा उपलब्ध आहे. नागपुरातील गोदामांची धान्य साठा क्षमता ७५ हजार मेट्रिक टन असून सध्या या गोदामांमध्ये ७० हजार मेट्रिक टन सााठा करण्यात आलेला आहे. या गोदामांमधून दर महिन्याला २५ हजार मेट्रिक टन धान्याचा पुरवठा होत आहे. धान्याचा किमान तीन महिने पुरवठा होऊ शकेल एवढा साठा विभागीय कार्यालयाच्या गोदामांमध्ये आहे. प्रामुख्याने गहू आणि तांदळाचा साठा या गोदामांमध्ये आहे. पंजाब, हरयाणा, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून उत्तम दर्जाचे धान्य खरेदी करून येथील गोदामात साठविले जाते. छत्तीसगड आणि विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्य़ांतून तांदूळ खरेदी करून येथे साठविला जातो. विदर्भात सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी तसेच लष्कराने केलेल्या मागणीप्रमाणे धान्याचा पुरवठा केला जात आहे.
पावसाळ्यात धान्याची नासाडी होऊ नये म्हणून आधीपासून काळजी घेतली जाते. रेल्वे मालगाडी आणि ट्रकने आलेले धान्य गोदामात साठविले जाते. ‘मान्सून पूर्व उपाययोजना’मध्ये गोदामात दर पंधरवडय़ाला कीड प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जाते. गोदामांमध्ये कीटकनाशक गोळ्या टाकण्यात येतात. गॅस प्रूप कव्हर टाकून एक आठवडय़ांपर्यंत माल झाकून ठेवला जातो. दर पंधरवडय़ाला धान्याची तपासणी केली जाते.
देशातील प्रत्येक नागरिकाला अन्न सुरक्षा उपलब्ध व्हावी, अशी सरकारची योजना आहे. गेल्या वर्षी देशात २,५२० लाख टन धान्याचे उत्पादन झाले. भारतीय हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्याने धान्याचे उत्पादनही चांगले होण्याची शक्यता आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य सरकारकडून ‘एफसीआय’कडे धान्य पुरवठय़ासाठी मागणी केली जाते. त्याप्रमाणे विविध केंद्रामार्फत धान्य पुरवठा केला जातो.
गोदामातील धान्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडू नये म्हणून विशेष काळजी घेतली आहे. आग विझविण्यासाठी कार्यालय आणि गोदामांमध्ये लावलेल्या व्यवस्थेची दरवर्षी तपासणी केली जाते.
मान्सून पूर्व उपाययोजना
धान्याची नासाडी होऊ नये म्हणून किडीचा प्रकोप थांबण्यासाठी उपाय योजले आहेत. गोदामात गळती होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे. पूर किंवा पावसाचे पाणी गोदामांमध्ये शिरणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली असून धान्याची देखरेख करण्यासाठी विशेष विभाग आहे. पावसामुळे धान्य नासाडी रोखण्यात यश मिळविले आहे. या कार्यालयाने ‘मान्सून पूर्व उपाययोजना’ आखून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली असल्याचे भारतीय अन्न महामंडळाच्या नागपूर कार्यालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक आर. एन. जनबंधू यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 3:08 am

Web Title: fci takes special care of food grains
Next Stories
1 विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य खरेदीची सक्ती केल्यास कारवाई
2 तोतरे बोलण्याची नक्कल;मित्रानेच केला मित्राचा खून
3 मद्य उद्योगातील कामगार मागण्यांसाठी रस्त्यांवर
Just Now!
X