बीसीयुडी-विधी विभागाची अनभिज्ञताही चव्हाटय़ावर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने जाहीर केलेल्या ३३८ महाविद्यालयांच्या यादीवरून शिक्षण क्षेत्रात घबराट पसरली असली तरी विद्यापीठाच्या बीसीयुडी विभाग आणि विधी विभागाची अनभिज्ञता यामुळे चव्हाटय़ावर आली आहे.
विद्यापीठाने ३३८ महाविद्यालयांची यादी प्रकाशित करून नंतर शिक्षण संचालकांच्या रट्टय़ामुळे लागलीच सुधारित यादी प्रकाशित केली. जुनी यादी संकेत स्थळावरून गायब करण्यात आली. मात्र, बीसीयुडी आणि संबंधित विभागाच्या बाळबोध कृतीमुळे विद्यार्थी व पालक त्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास घाबरत असून रोज त्यसंबंधीचे कोणाचे ना कोणाचे निवेदन किंवा पत्रक घेऊन विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत विद्यापीठ किंवा विद्यार्थी संघटना दाखल होत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर या संबंधी एक निवेदन विद्यापीठाला सादर करून कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावेत, याची माहिती देणारे मार्गदर्शन केंद्र विद्यापीठात सुरू करावे, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाविषयी विद्यापीठाचे कर्मचारीही अनभिज्ञ आहेत. दुसरीकडे प्रवेश होतील की नाही अशी धास्ती संस्था चालक घेतली आहे. अभिजित वंजारी, महेंद्र निंबार्ते यांनी यासंबंधी तातडीने व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलवावी अशी मागणी कुलगुरूंकडे केली आहे.
तंत्रशिक्षण संचालनालया व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश करण्यात करण्यात येतात. ही प्रक्रिया सुरू असतानाच अभियांत्रिकी, एमबीए, फार्मसी इत्यादी महाविद्यालयांची नावे विद्यापीठाच्या यादीत असल्याने  त्याठिकाणी प्रवेशासंबंधीची माहिती वरिष्ठांकडे पाठवण्यात आली आहे. एकटय़ा भंडाऱ्यातील ४६ महाविद्यालयावर विद्यापीठाने कुऱ्हाड चालवली. मात्र तेथील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी जायचे कोठे याचे गांभीर्य विद्यापीठाच्या बीसीयुडीने लक्षात घेतलेले नाही. विद्यापीठाने निर्माण केलेल्या भयग्रस्त वातावरणाचे बळी स्वत: विद्यापीठ ठरत आहे. येत्या २४ जूनला विद्यापीठाला न्यायालयात यासंदर्भात उत्तर दाखल करायचे असल्याने विद्यापीठाचा कॉलेज विभाग तर या प्रकरणाची माहिती गोळ करण्यासाठी आकंठ बुडाला आहे.