भूखंड व्यवहारांची तपासणी होणार
पुणे बॉम्बस्फोटातील आरोपींना शस्त्रे दिल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या बंटी जहागीरदार याच्या स्थानिक सहकाऱ्यांची पोलीस चौकशी केली जाणार आहे. तसेच बंटी याने केलेल्या भूखंड खरेदी-विक्री प्रकरणाची तपासणी होणार असल्याने आता अनेक प्रतिष्ठितांचेही धाबे दणाणले आहे.
बंटी जहागीरदार याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून त्याचा दहशतवादी कारवायांशी संबंध असावा असा संशय स्थानिक पोलिसांना पूर्वीपासून होता. असे असूनही पोलिसांनी बंटीवर प्रतिबंधात्मक कारवाई केली नव्हती. उलट पोलीस ठाण्यात येऊन तो अनेक गुन्ह्यांत मांडवली करत असे. त्यासंबंधी लेखी तक्रारीही पूर्वी करण्यात आल्या होत्या. संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांविरूद्ध तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्याकडे अहवाल पाठविला होता. काही पोलीस कर्मचारी बंटी याच्याबरोबर संबंध ठेवून आहेत, असेही या अहवालात नमूद करण्यात आले होते. परंतु या अहवालाची दखलच घेण्यात आली नाही.
गेल्या दोन वर्षांत बंटीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे टाळले गेले होते. पण अतिरिक्त पोलीस अधिक्षिका सुनीता ठाकरे-साळुंके यांनी सुत्रे घेतल्यानंतर त्याच्याविरूद्ध एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. बंटी याने गावठी पिस्तुलाचा दस्ता एकाला मारला होता. या गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने झाला नाही. आर्थिक तडजोडी झाल्याने बंटीला क्लिन चीट देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे हा प्रकार घडला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मुरकुटे हे नेहमीच पोलिसांवर दडपण आणत असत. पोलीस डायरीमध्ये तशा नोंदी वारंवार करण्यात आलेल्या आहेत. आता मात्र कुणाच्याही दडपणाला न जुमानण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने बंटीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली असून बंटीचे पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मागविले आहे. शिंदे हे रजेवर असूनही त्यांनी या प्रकरणात लक्ष घातले, हे विशेष. बंटी याच्या साथीदाराची यादी तयार केली जात असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत ही मोहीम राबविली जाणार आहे.
राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचे बंटीशी आर्थिक हितसंबंध आहेत. काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने जमीन खरेदी-विक्रीच्या प्रकरणात बंटीशी भागिदारी केली आहे. विशेष म्हणजे अनेक भूखंडाचे व्यवहार करताना दबावतंत्राचा अवलंब झाला. तशा तक्रारी पूर्वीच पोलिसांकडे आल्या होत्या. निनावी तक्रारींचा त्यामध्ये भरणा आहे. तसेच काही प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी वसुलीसाठी बंटीची मदत घेतली होती. अशा सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता ठाकरे-साळुंके यांनीही त्याला दुजोरा दिला.
बंटी याचा वाळू तस्करीत सक्रीय सहभाग असला तरी गेल्या दोन वर्षांत त्याच्यावर दंडात्मक, तसेच फौजदारी स्वरुपाची कारवाई झालेली नाही. मात्र, आता दहशतवाद विरोधी पथकाचे वरिष्ठ अधिकारी बंटीच्या आर्थिक स्त्रोतांचा शोध घेणार आहेत. बंटीला अटक झाल्यानंतर महसूल खात्याचे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांकडे अनेकांनी निनावी पत्रे पाठविली असून वाळूतस्करांना मदत करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. तालुक्यात गुन्हेगारी वाढण्यास वाळूतस्करी कारणीभूत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी येत्या आठवडाभरानंतर वाळू तस्करांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.