छत्रपती शिवाजी शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर उपचारासाठी विलंब केल्यावरून एका निवासी डॉक्टरला केलेल्या मारहाणीमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तिघे पोलीस निलंबित झाल्याच्या पार्श्र्वभूमीवर सोलापुरात पोलीस कर्मचा-यांच्या कुटुंबीयांची संघटना स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही संघटना स्थापन झाल्यास त्याचा उद्देश कितीही चांगला असला तरीही त्याचा दुरुपयोग होण्याची व त्यातून पोलीस प्रशासन व्यवस्थेसमोर आव्हान उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
 खात्यांतर्गत कायद्यानुसार आपणास थेट संघटना उभारता येत नाही किंवा ‘आवाज’ उठविता येत नसल्यामुळे पोलिसांनी आपल्या कुटुंबीयांना पुढे करून संघटना स्थापन करण्यासाठी पावले उचलली आहेत. यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस कुटुंबीयांचे मतही तयार केले जात आहे. त्यासाठी शहरातील एका जबाबदार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने घेतलेल्या पुढाकाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलीस कुटुंबीय संघटना स्थापन करण्यामागचा उद्देश कितीही चांगला असला तरी ही संघटना प्रतिमा डागाळलेल्या व गुन्हेगारीशी हितसंबंध ठेवून असलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात गेली तर ‘रोगापेक्षा औषध भयंकर’ अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती निवृत्त सहायक पोलीस आयुक्त दिलीप शेपाळ यांनी व्यक्त केली. जोपर्यंत अशा संघटनेची सूत्रे प्रामाणिक व स्वच्छ पोलीस कुटुंबीयांच्या हाती राहतील, तोपर्यंत ठीक आहे. परंतु काही मूठभर पोलीस कुटुंबीयांनी स्वत:च्या लाभासाठी संघटनेचा ताबा घेतला तर संघटनेचा हेतू सफल न होता वैयक्तिक हेवेदावे होऊन प्रसंगी त्यास जातीयतेचा व राजकारणाचा रंगही चढण्याचा धोका संभवतो आणि त्यामुळे पोलीस प्रशासन व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची भीती निवृत्त सहायक पोलीस आयपक्त दीपक जतकर यांनी व्यक्त केली. पोलीस कुटुंबीय संघटनेचे हे लोण नंतर राज्यभर पसरण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, पोलीस अत्याचाराच्या विरोधात उठाव करणाऱ्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळींना पोलीस कुटुंबीय संघटनेचा त्रास होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संघटना बांधणीबाबतच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष देण्याची व त्यास सहभागी असलेल्या मंडळींना चाप लावण्याची गरज असल्याचे मत मांडण्यात येत आहे.