News Flash

इंडस्ट्रीच्या बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेणारेच इथे टिकतील! – रिचा चढ्ढा

‘ओय लक्की लक्की ओय’ या चित्रपटात तिने डॉलीची भूमिका केली होती. छोटय़ाशा भूमिकेतील डॉली अगदी लक्षात राहिली पण, अभिनेत्री म्हणून तोच चेहरा पुन्हा दिसायला काही

| June 2, 2013 12:13 pm

‘ओय लक्की लक्की ओय’ या चित्रपटात तिने डॉलीची भूमिका केली होती. छोटय़ाशा भूमिकेतील डॉली अगदी लक्षात राहिली पण, अभिनेत्री म्हणून तोच चेहरा पुन्हा दिसायला काही महिने स्ट्रगलचे जावे लागले. मग ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’ च्या नगमा खातूनच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. दोन भागातल्या या चित्रपटात तिला तरूण आणि वृध्द अशा दोन वेगवेगळ्या वयातील नगमा रंगवायची होती. वय वर्ष २४ असूनही तिने या दोन्ही भूमिका वठवल्या. तिला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि दिल्लीची रिचा चढ्ढा एक हटके अभिनेत्री म्हणून बॉलिवुडच्या मांदियाळीत सामील झाली. आता फरहान अख्तर, रितेश सिधवानी निर्मित ‘फुकरे’ या चित्रपटा ती ‘भोली पंजाबन’ नावाच्या खलनायकी व्यक्तिरेखेत दिसणार आहे. पाठोपाठ भन्साळींच्या ‘राम लीला’ मध्ये ती काम करते आहे. एकापाठोपाठ दिवाकर, अनुराग ते पार फरहान आणि संजय लीला भन्साळी अशा वेगवेगळ्या शैलीतील निर्माता-दिग्दर्शकांबरोबर काम करणारी रिचा यालाच तर अभिनय म्हणतात, असे टेचात सांगते..
‘ओय लक्की लक्की ओय’च्या आधी खरे म्हणजे मी अनुराग कश्यपच्या ‘देव डी’ साठी ऑडिशन दिली होती. पण, तेव्हा अनुरागला कलकी कोचलिन सापडली. ‘देव डी’ची भूमिका कलकीला दिली असली तरी तुझी ऑडिशन मला आवडली. माझ्या पुढच्या चित्रपटात नक्की तुझ्यासाठी भूमिका असेल, असं आश्वासन अनुरागने दिलं खरं पण, ते एवढं मनावर घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. मी विसरूनही गेले. दरम्यानच्या काळात दिबाकरबरोबर ओय लक्की.. केला. त्यानंतरचे दिवस मात्र वाईट होते. चांगल्या भूमिकेची दिवसेंदिवस वाट पाहण्याचे ते दिवस होते. हा दुष्काळ अनुरागच्या फोनने संपवला. त्याने खरोखर मला त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी फोन केला होता. ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’मध्ये तुला तरूण नवविवाहित आणि वृध्द अशा दोन वेगवेगळ्या वयातील नगमाची भूमिका तुला करायची आहे, असं अनुरागने सांगितलं. पण, वृध्द नगमाच्या भूमिकेत मी चपखल बसेन?, माझ्या या प्रश्नावर तु दोन्ही भूमिका उत्तम करशील. बाकी माझ्यावर सोपव, असं उत्तर आलं. बस्स! नगमाच्या भूमिकेने जादू केली, रिचा शांतपणे सांगते.
 सध्या इंडस्ट्रीकडे नीट बघितलंत तर आत्ताची दिग्दर्शक मंडळी कुठल्याच चौकटीतले विचार करत नाहीत. त्यांच्यासाठी त्यांची कथा-पटकथा आणि मग ते पडद्यावर जिवंत करणारे कलाकार जास्त महत्त्वाचे आहेत. त्यांना तिथे तथाकथित ‘स्टार’ नको आहेत.
तुमच्यासारख्या तुलनेने नविन कलाकारांना इंडस्ट्रीतील स्टारडमच्या वलयात वावरणारे लोक आदराने वागवतात..हो खूप चांगल्या पध्दतीने वागवतात, असं पहिल्याच फटक्यात सांगून टाकलं तरी जे चांगलं वागत नाहीत त्यांना आम्हीही फारसा भाव देत नाही, असं सांगणारी रिचा आणखी पुढे जाऊन आपलं निरीक्षण नोंदवते. याबाबतीत मला रणबीर क पूर आणि करण जोहर दोघांचीही नावे आवर्जून घ्यायला आवडतील. या दोघांनीही बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेतले आहे. रणबीर आजच्या घडीला ‘स्टार’ आहे. पण, ते स्टारपण त्याच्या वागण्याबोलण्यात नाही. तो सगळ्यांशी सहजतेने बोलतो, विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण करतो. तीच गोष्ट करण जोहर सारख्या यशराजच्या श्रीमंत वातावरणात वाढलेल्या दिग्दर्शकाच्या बाबतीतही लक्षात येईल.  ज्यांनी या बदलत्या प्रवाहांशी जुळवून घेतले आहे तेच लोक इथे टिकून राहतील त्याहीपेक्षा राज्य करतील. आणि जे आपल्या स्टार इमेजमध्ये अजूनही अडकून पडलेत ते कधीच मागे फेकले गेलेत, अशा लोकांची नावंही तोंडावर आणावीशी वाटत नाहीत, असेही ती स्पष्टपणे सांगते.  अनुराग कश्यप तुम्हाला कलाकार म्हणून स्वातंत्र्य देतो. ही माझी कथा आहे, तु ती कशी रंगवशील?, ही अनुरागची शैली.. दिबाकर खूपच हुश्शार आहे. त्याला माणसं बघितली की कळतं की आपल्याला याच्याकडून काय हवंय. तो ते काढून घेतो. आणि आत्ता मी संजय लीला भन्साळींबरोबरही काम करते आहे.
अरे बापरे! मी त्यांची आवडती अभिनेत्री आहे. पण, जोपर्यंत त्यांना माझ्याकडून विलक्षण काम मिळत नाही तोपर्यंत टेकवर टेक आणि रिहर्सल्स आणि ‘रिचा.. यह करोगी तुम? हो क्या गया है तुमको? तुम सबसे अच्छी अदाकारा हो और ऐसा काम दिखाओगी लोगोंको..’ हे ऐकल्यावर काय बिशाद आहे माझी वाईट काम करण्याची. माझं काम चांगलंच होणार. त्यामुळे प्रत्येकाच्या शैलीनुसार कामाचा ताणही वेगळा असतो. अनुरागबरोबर काम करताना बस्स! तुम्ही काम करत रहा एकदम स्वातंत्र्यात वावरत असतो. तेच भन्साळींबरोबर काम करताना प्रत्येक क्षण परीक्षेचा असतो. त्यामुळे त्या क्षणांची टक्केवारीही तितकीच उत्तम जमते..हे सगळं अनुभवता येणं माझ्यासाठी भाग्याचं आहे. आपण इंडस्ट्रीच्या एकदम चांगल्या आणि प्रयोगशील युगात काम करतो आहोत जिथे आपल्या कामाची खरी पावती मिळते आहे. आता या क्षणाला इथे गुणवत्ता असलेल्या कलाकाराला नाव, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. फक्त या प्रवाहात उडी घ्यायचं धैर्य तुमच्यात हवं ते माझ्यात आहे. खरंच! ‘फुकरे’मधली माझी भोली पंजाबन बघा. तुम्हाला गब्बरसिंगची आठवण आल्यावाचून राहणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 12:13 pm

Web Title: feature article on actress richa chadda
टॅग : Bollywood
Next Stories
1 फक्त गाणी, बाकी सबकुछ रणबीर
2 ‘लोच्या झाला रे..’
3 ‘ब्लॅक नाइट्स’: शोषणाचा वर्तमान पंचनामा
Just Now!
X