ज्येष्ठ गायक पं. सी. आर. व्यास यांच्या संगीताचा वारसा प्रसिद्ध गायक पं. सुहास व्यास आणि संतूरवादक सतीश व्यास हे पुढे नेत आहेत. सतीश व्यास हे १६ नोव्हेंबर रोजी वयाची साठ वर्षे पूर्ण करीत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडत आहेत सुहास व्यास..

भा लचंद्र हे सतीशचे मूळ नाव.  त्याचा जन्म तुळजापूरला झाला. कीर्तनकार आणि वैद्य असलेले माझे आजोबा रघुनाथ व्यास यांनीच भालचंद्र हे नाव ठेवले. पत्रिकेचे उत्तम ज्ञान असलेल्या आजोबांनी ‘हा मुलगा संपूर्ण व्यास घराण्याच्या आणि विशेष करून वडिलांच्या उत्कर्षांचे कारण ठरेल’, असे त्यांनी आईला सांगितले होते. लहानपणापासूनच सतीश हा शिस्तबद्ध आणि स्वच्छताप्रिय. आम्हाला बहीण नसल्यामुळे घरामध्ये कोणतेही काम अडता कामा नये, अशी आईची शिकवण होती. सतीशने मुंबई विद्यापीठातून स्टॅटिस्टिक्स या विषयातून एम. एस्सी. पदवी संपादन केली. त्यामुळे आयुष्यातील गणितं त्याने चांगल्या पद्धतीने सोडविली असे त्याचे मित्र म्हणतात. त्याने व्यवस्थापनाचा अभ्यास केला असल्यामुळे जीवनातील प्रत्येक गोष्ट अगदी नियोजनपूर्वक केली.

मुंबईला आम्ही लहान घरामध्ये राहत असल्याने बाबांचा रियाझ एवढा कानावर पडायचा की आम्हाला आपोआपच संगीताची रुची निर्माण झाली. पण, संगीत शिकविण्यासाठी त्यांनी कधीही आमच्यावर सक्ती केली नाही. खरे तर, सतीशचा आवाज चांगला असल्यामुळे त्याने गाणे करावे आणि आवाज फुटल्यामुळे मी वाद्यसंगीत करावे, अशी बाबांची इच्छा होती. त्याने गाणे केले असते तर, पं. राजन-साजन मिश्रा किंवा रमाकांत आणि उमाकांत या गुंदेचा बंधू यांच्याप्रमाणे आम्ही एकत्र मैफलीदेखील केल्या असत्या.

एकदा मुंबईच्या वल्लभ संगीत विद्यालयाच्या वार्षिक सभेमध्ये बाबांचे गायन आणि पं. शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन असा कार्यक्रम होता. शिवजींचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे वादन ऐकून तो भारावून गेला. त्याने संतूर शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली. बाबांचा मूड पाहून ‘सतीशला संतूर शिकायचे आहे. तुम्ही शिवजींशी बोला’, असा विषय मी मांडला. ‘आपका लडका है तो भेज दिजीये’ असे शिवजी म्हणाले आणि सतीशच्या संगीत शिक्षणाचा मार्ग खुला झाला.

 सुरांचा अभ्यास लहानपणापासून चांगला असल्यामुळे बाबा आणि शिवजी अशा दोघांकडूनही त्याला रागसंगीताचे ज्ञान मिळाले. गाणं जितके शिकता त्यापेक्षाही ते जास्त ऐकावे लागते. मी आणि सतीश, आम्ही दोघांनी हे भरपूर केले. आग्रा घराण्याचे पं. जगन्नाथबुवा पुरोहित, ग्वाल्हेर घराण्याचे राजारामबुवा पराडकर हे बाबांचे गुरू, त्यांचे गुरुजी यशवंतबुवा मिराशी यांच्यासह पं. राम मराठे आणि पं. जितेंद्र अभिषेकी हे बाबांचे गुरुबंधू सातत्याने आमच्याकडे येत असत.

विविध बंदिशी आणि वेगवेगळे राग ऐकायला मिळाले. त्यामुळे एरवी संतूरवर कधीही न वाजविले गेलेले राग सतीशने आपल्या वादनातून सादर केले.

बाबांनी गाणं आमच्यावर लादले नाही. आम्ही स्वतहून संगीत शिकू लागलो तेव्हा त्यांनी भरभरून दिले. रियाझाला पर्याय नाही हे बाबांनी त्यांच्या उदाहरणावरून दाखवून दिले. गाणं हे ‘प्रोफेशन’ करा, असे बाबांनी कधी सांगितले नाही. आमचा कार्यक्रम ठेवा, असे सांगण्यासाठी कोणालाही दूरध्वनी केला नाही. व्यास कुटुंबाला बदलून टाकणारे गुणीदास संगीत संमेलन हा सतीशच्या आयुष्यातील ‘टर्निग पॉईंट’ १९७७ मध्ये आला. आपल्या गुरूंविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे संमेलन करण्याचे बाबांचे स्वप्न साकार झाले. हे संमेलन इतके दणक्यात झाले की खुद्द पं. कुमार गंधर्व यांनी पत्र पाठवून सतीश याच्या कामगिरीचे कौतुक केले होते. संगीत महोत्सवांच्या मैफलीचा सतीश हा ‘ट्रेन्ड सेटर’ बनला.

गुरुजींच्या मैफली असायच्या तेथे तो मुद्दाम कंपनीचे काम काढून त्या शहरामध्ये जात असे. समोर बसून तो जेवढे शिकला असेल त्यापेक्षाही अधिक तो श्रवण आणि निरीक्षणातून शिकला. १९८८ पासून सतीशने स्वतंत्र संतूरवादनाच्या मैफलीची सुरुवात केली.

सर्वाशी चांगले ऋणानुबंध ठेवलेले असल्यामुळे त्कोणत्याही कलाकाराने त्रास दिलेला नाही. माझ्या संगीत कारकिर्दीमध्येही सतीशचे योगदान मोठे आहे. त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याची पत्नी रेखा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझ्या भावाला दीर्घायुरारोग्य लाभो!