संचालक मंडळ व कापूस खरेदीदारांच्या संगनमताने नियमाप्रमाणे मार्केट व सुपरव्हिजन शुल्क वसूल न झाल्यामुळे जिंतूर बाजार समितीचे उत्पन्न लाखोंनी घटले. यास जबाबदार संचालक मंडळ व कापूस विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आसेगाव येथील शिवाजी पवार यांनी जिल्हा उपनिबंधकाकडे केली.
जिंतूर बाजार समितीतील मार्केट व सुपरव्हिजन शुल्कात झालेल्या लाखोंच्या घोटाळय़ाचे प्रकरण जिल्हय़ात गाजत आहे. कापूस खरेदीवर बाजार समितीला एक टक्क्याप्रमाणे मार्केट शुल्क मिळते, तर मार्केट शुल्कावर पाच टक्क्यांप्रमाणे सुपरव्हिजन शुल्क आकारण्याचे अधिकार आहेत. या नियमानुसार २०११-१२ व २०१२-१३ या वर्षांत कापूस खरेदीवर १ कोटी ७८ लाख ७३ हजार २७५ रुपये मिळणे अपेक्षित होते. परंतु बाजार समितीकडे २००९ ते २०१३ या ४ वर्षांत केवळ १ कोटी ४१ लाख ७९ हजार ५१३ एवढेच मार्केट व सुपरव्हिजन शुल्क जमा झाले. अर्थातच, संचालक मंडळ व कापूस खरेदीदार यांच्या संगनमतामुळेच बाजार समितीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या घोटाळय़ाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पवार यांनी केली.