News Flash

सोलापूर जिल्हय़ात मृग नक्षत्राने पाठ फिरविली

सोलापूर जिल्हय़ात मृग नक्षत्राच्या पावसाने मागील तीन दिवसांपासून पुन्हा दडी मारली असल्याने खरीप पिकांच्या पेरण्यांना आलेला वेग मंदावला आहे.

| June 19, 2013 01:50 am

सोलापूर जिल्हय़ात मृग नक्षत्राच्या पावसाने मागील तीन दिवसांपासून पुन्हा दडी मारली असल्याने खरीप पिकांच्या पेरण्यांना आलेला वेग मंदावला आहे. मृग नक्षत्राचा पाऊस इतरत्र चांगली साथ देत असताना सोलापूर जिल्हय़ात पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळग्रस्त शेतकरीवर्गात चिंतेचे सावट पसरले आहे. दरम्यान, जिल्हय़ात अद्याप मुक्या जनावरांसाठी ३१३ चारा छावण्या सुरूच असून त्या ठिकाणी दोन लाख ५५ हजार ७२५ लहानमोठी जनावरे दाखल आहेत. तर तहानलेल्या सुमारे १२ लाख ६० हजार लोकसंख्येला ६६९ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. टँकरची संख्या घटली नसल्याचे दिसून येते.
जिल्हय़ात रोहिणी नक्षत्राच्या पावसाची साथ सहसा लाभत नाही. परंतु यंदाच्या वर्षी या नक्षत्राने चांगली साथ दिल्याने सर्वाच्या आशा पल्लवित झाल्या. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्याच्या तयारीला वेग आला होता. परंतु नंतर मृग नक्षत्राने अपेक्षित साथ न दिल्याने पेरण्यांचा वेग मंदावत गेला. गेल्या तीन-चार दिवसांपासून तर जिल्हय़ात पाऊस पडत नसल्याने पुन्हा चिंतेचे सावट पसरले आहे. जिल्हय़ात गेल्या १ जूनपासून आजतागायत ६१.१५ मिमी सरासरीने ६७२.६६ मिमी इतका पाऊस झाला. पावसाळय़ात एकूण पडणाऱ्या पावसाच्या १२.५१ टक्के इतका पाऊस होऊ शकला. यात आतापर्यंत सर्वाधिक ११८.२० मिमी पाऊस टँकरची सर्वाधिक संख्या असलेल्या माढा तालुक्यात झाला. तर त्या खालोखाल माळशिरस तालुक्यात ८६ मिमी पाऊस झाला. तर सर्वात कमी म्हणजे २९ मिमी पाऊस बार्शी तालुक्यात झाल्याचे दिसून येते. या तालुक्याची आतापर्यंत पडणाऱ्या पावसाची सरासरी ६७.८६ मिमी एवढी अपेक्षित होती. दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यात आतापर्यंत सरासरी ५१.६० मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्याहून जास्त म्हणजे ५५.२६ मिमी पाऊस झाला. अक्कलकोट (५२), उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर (प्रत्येकी ५६.९०) पंढरपूर (६६.९३), मंगळवेढा (४०.३३), मोहोळ (६७.८०) व करमाळा (४७) याप्रमाणे विविध तालुक्यांत पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
दरम्यान, जिल्हय़ात अद्याप पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या घटली नाही. सध्या १२ लाख ६० हजार १६९ लोकसंख्या असलेल्या ५१० गावे व २८३० वाडय़ांना ६६९ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यंदा आतापर्यंत सरासरीपेक्षा दुप्पट म्हणजे ११८ मिमी इतका सर्वाधिक पाऊस माढा तालुक्यात होऊनदेखील त्या ठिकाणी तब्बल ९४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तर दुष्काळाचे शाप असलेल्या सांगोला तालुक्यात ९३ टँकरचा वापर पाणीपुरवठय़ासाठी होत आहे.
माढा तालुक्यातील ८७ गावे व ४८४ वाडय़ांतील बाधित एक लाख ९७ हजार ४४० लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तर सांगोला तालुक्यातील एक लाख ३८ हजार ३१२ लोकसंख्येची ७४ गावे व ६५२ वाडय़ा टँकरग्रस्त आहेत.
याशिवाय मंगळवेढा तालुक्यात ६४ गावे ४५४ वाडय़ांना ८७ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तर पंढरपूर तालुक्यात ५७ गावे व ४१३ वाडय़ांना अद्याप ९० टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. याशिवाय मोहोळ (७७), करमाळा (७५), माळशिरस (४१), अक्कलकोट (३९), दक्षिण सोलापूर (२६), उत्तर सोलापूर (२२), बार्शी (२५) याप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण ६६९ टँकरपैकी केवळ १६ टँकर शासकीय असून उर्वरित ६५३ टँकर खासगी मालकीचे आहेत. यात बहुसंख्य टँकर हे राजकीय पुढाऱ्यांशी संस्थांशी संबंधित असल्याचे बोलले जाते.
जिल्हय़ात अद्याप मुक्या जनावरांसाठी चारा छावण्या सुरूच असून सद्य:स्थितीत ३१३ चारा छावण्या सुरू असून यात दोन लाख २२ हजार ३२० मोठी व ३३ हजार ४०५ लहान जनावरे दाखल आहेत. सर्वाधिक ९५ चारा छावण्या सांगोला तालुक्यात असून तेथे दाखल जनावरांची एकूण संख्या एक लाख ३६५८ इतकी आहे. मंगळवेढा तालुक्यात ७८ चारा छावण्यांमध्ये ४३ हजार ३५२ जनावरे चारा फस्त करीत आहेत. माढा तालुक्यातील ३४ चारा छावण्या कार्यरत असून त्या ठिकाणी दाखल जनावरांची संख्या २६ हजार ५९३ एवढी आहे. याशिवाय मोहोळ (४६), करमाळा (२०),पंढरपूर (३४), माळशिरस (१२), अक्कलकोट (३), दक्षिण सोलापूर (११), उत्तर सोलापूर (१) याप्रमाणे चारा छावण्या सुरू आहेत. त्यावर आतापर्यंत २५५ कोटी ११ लाख ८३ हजार १९३ रुपये इतका प्रचंड खर्च झाला आहे. तर यापूर्वी १५ ऑगस्टच्या पूर्वी जिल्हय़ात चारा डेपो सुरू होते. त्यावर सुमारे शंभर कोटींचा खर्च झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 1:50 am

Web Title: feint of rain to solapur district
Next Stories
1 प्रशासनाचे अतिवृष्टी व संभाव्य धोक्यांकडे दुर्लक्ष-शंभूराज देसाई
2 शाखा अभियंता पोवार व पानसंबळ निलंबित
3 दीड हजार आंदोलकांना अटक व सुटका
Just Now!
X