मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मंगळवारच्या दौऱ्यात चांदीची तलवार देऊन सत्कार आणि रिक्षाचालकांचा निषेध अशा दोन्ही टोकाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री चव्हाण यांचा हा दौरा राजर्षी शाहूंचे स्मारक, कोल्हापूरची थेट पाणी योजना, टोल आकारणी याबाबतीत समाधानकारक ठरला. रिक्षाचालकांच्या प्रश्नांकडे पूर्णत: डोळेझाक केल्याने त्यांच्यातून मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांच्या निषेधाचा सूर उमटला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंगळवारच्या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन होते. राज्यशासनाने नुकतेच कोल्हापूर शहरात ३५ मीटर (११ मजली) इमारत बांधण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोल्हापूरच्या विकासाला हातभार लागण्याबरोबर शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत क्रीडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या संघटनेने केले होते. आजच्या दौऱ्याचे निमित्त साधत क्रीडाई संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही याकरिता प्रयत्न केल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. क्रीडाईचे अध्यक्ष राजीव परिख व सहकारी या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोल्हापूर थेट पाइपलाइन योजना होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचा पुनरुच्चार केला. तर त्यांना भेटलेल्या टोलविरोधी कृती समितीला टोल आकारणी रद्द करण्याबाबत शासनाने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासित केले. त्यामुळे या दोन मुद्यांना धरून लढणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला.
कोल्हापुरातील रिक्षाचालकांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे निमित्त साधत आज बंद पुकारला होता. इलेक्ट्रॉनिक मीटरच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला रिक्षाचालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मध्यवर्ती बसस्थानकासह शहरातील सर्व स्टॉपवर आज शुकशुकाट दिसत होता. नाताळ व नववर्षांचेनिमित्त साधून सुट्टीवर आलेल्या पर्यटकांसमोर यामुळे समस्या उद्भवल्या. त्यांना महापालिकेच्या के.एम.टी.बससेवेवर अवलंबून राहावे लागले. दरम्यान मुख्यमंत्री चव्हाण व पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रिक्षाचालकांच्या प्रश्नांची दखल न घेतल्याने रिक्षाचालकांकडून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. कोल्हापूरला नेहमी सापत्नभावाची वागणूक देणारे शासन रिक्षाचालकांच्या मागण्यांनाही वाटाण्याच्या अक्षता लावत आहे.याबद्दल त्यांच्याकडून संताप व्यक्त केला गेला. शिवशक्ती, करवीर, कॉमन मॅन, महाराष्ट्र, आदर्श, न्यू करवीर, शाहू रिक्षा, ताराराणी, हिंदुस्थान, विद्यार्थी वाहतूक यासह अनेक रिक्षासंघटनांनी मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदविला आहे. तसे पत्रक संजय भोळे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.