गेल्या दीड महिन्यापासून संगमनेर तालुक्यातील चिंचपूर शिवारात धुमाकूळ घातलेल्या बिबटय़ांची जोडी आज सकाळी पिंज-यात जेरबंद झाली. मात्र बिबटय़ाच्या मादीने पिंज-याच्या लोखंडी छताचा पत्रा धडका देऊन बाहेरच्या दिशेला वाकवून सर्वांच्या समोर पलायन केले. त्यामुळे वन विभागाच्या पिज-याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चिंचपूर शिवारातील शेतक-यांना बिबटय़ाच्या नर-मादीने त्रासून सोडले होते. या जोडीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने बारभाई रस्त्यावरील बबन तांबे यांच्या शेताच्या कडेला दि. १० जुन रोजी पिंजरा लावला होता, मात्र ही जोडी त्याला हुलकावणी देत होती. काल (शुक्रवारी) रात्री बिबटय़ाची मादी पिंज-यात जेरबंद झाली. आज सकाळी वनमजूर बाळासाहेब डेंगळे व बी. एम. अरगडे यांनी बिबटय़ाची मादी जेरबंद झालेला पिंजरा सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान वन विभागाच्या निंबाळे येथील रोपावाटिकेत पोहोच केला. निंबाळे रोपवाटिकेतील मंदिराच्या समोरील मोकळया जागेत ठेवल्याल्या या जुनाट पिंज-याच्या छताला धडका मारून बाहेरच्या दिशेने लोटण्यात यश आल्यावर निर्माण झालेल्या झरोक्यातून मादीने पलायन केले. तेथेच रोजंदारीवर काम करीत असलेल्या महिलेच्या समोर हा प्रकार घडल्याने त्यांचीही पाचावर धारण बसली. या वेळी संगमनेर वन परिक्षेत्र अधिकारी आर. बी. दारकुंडे उपस्थित होते. त्यांच्यासमोर हा प्रकार घडला. त्यामुळे वन विभागाच्या पिंज-यांच्या दर्जाबाबतच शंका निर्माण होत आहेत.