महिलांवरील अत्याचाराविरूध्द जागर करण्याचा निर्धार मराठा विद्या प्रसारक समाजाच्या येथील सीएमसीएस महाविद्यालयात ‘स्पंदने तारुण्याची’ या युवा व्यासपीठातंर्गत आयोजित ‘महिला शोषण-आत्मचिंतन’ या विषयावरील चर्चासत्रातून करण्यात आला.
माध्यम तज्ज्ञ तेजस बस्ते-धोपावकर, डॉ. वैभव फरताळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जी. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचे उद्घाटन झाले. प्रा. एस. पी. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंकिता गौर, निकिता कोंद्रे, रुची पिठाडिया या विद्यार्थिनींनी तयार केलेला ‘विश्वासावर अत्याचार’ हा लघुपट या वेळी दाखविण्यात आला. स्वातंत्र्याचे गोडवे गाणाऱ्या देशात महिलांवरील अत्याचार, विनयभंगाच्या घटना वाढतच आहेत.
केवळ बळाचा वापर करून हवे ते मिळवून फेकून द्यायचे, ही वृत्ती किती काळ खपवून घ्यायची, अशा सवाल तेजस बस्ते यांनी केला. या वेळी उपस्थित अनेक युवतींनी कधी कधी सामोरे जावे लागणाऱ्या नकोशा स्पर्शांचा उल्लेख केला. आजूबाजूला वावरणाऱ्या नराधमांना धाक बसविणे अत्यंत गरजेचे असून पाप नेहमी भित्रे असते, असे डॉ. वैभव फरताळे यांनी नमूद केले. घर, कुटुंब, मैत्रिणी, शिक्षक, डॉक्टर यांची  पाठिंब्याची यंत्रणा उभी करण्याचे आवाहन त्यांनी केले. मन मोकले करता येईल अशा शिक्षिका, आई आणि स्वत:मधील खंबीरपणा यातून जरब निर्माण होऊ शकेल, असेही ते म्हणाले.
सोशल साईटस्चा अतिरेकी वापर
टाळणे, स्वसंरक्षणास सज्ज असणे, पोलीस, कायदा तसेच सामाजिक भीती निर्माण होणे शक्य झाले तरच विश्वासाच्या नात्यावरचे अत्याचार थांबवता येतील, असे प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी सांगितले. युवक युवतींनी अत्यंत खुलेपणाने आपले मत मांडले. प्रा. पी. आर. कदम यांनी आभार मानले.