जरीपटका परिसरात सध्या शांतता असली तरी तेथील महिलांसह नागरिकांमध्ये दहशत असून १६ व १७ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराची सेवानिवृत्त न्यायाधीशांकरवी चौकशी व्हावी, अशी मागणी या परिसरातील महिलांची आहे. गेल्या काही वर्षांत पोलिसांचे ‘पोलिसिंग’च ठाकठीक नसल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिकांनी केला.
पुरुषोत्तम उर्फ परशु मनहरलाल बत्रा या तरुणाच्या खुनानंतर पोलिसांच्या कारवाईबद्दल तेथील नागरिकांमध्ये संताप असल्याचे दिसून आले. जमाव पांगल्यानंतरही पोलिसांचा अत्याचार अनाकलनीय असल्याचे नागरिकांनी सांगितले. परशु बत्रा राहतो त्या गल्लीत पोलिसांनी कहर केला. अनेकांच्या घरात शिरून काठय़ांनी झोडपणे सुरू केले. परशुच्या भावाच्या घरात जमावातील दोघे-तिघे शिरल्याने पोलीसही धावत आले. घराचे बंद दार लाथा मारून उघडले. स्वयंपाक खोलीत शिरून महिलेला काठय़ांनी मारहाण केली. ज्याचा खून झाला त्या परशूच्या घरात पोलीस घुसले. परशूच्या आईचे केस धरून बाहेर ओढत आणले. त्याच्या वडिलांवर काठय़ा चालविल्या. त्यामुळे त्यांचे डोके फुटले. रस्त्यावर वाहनांची तोडफोड जमावाने नव्हे, तर खुद्द पोलिसांनीच केली. या सर्व घटनांचे पुरावे या परिसरातील नागरिकांजवळ आहेत, असे तेते फेरफटका मारल्यावर दिसले.
जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, त्याबद्दल तेथील कुणाचाही आक्षेप नाही. मात्र, १६ व १७ ऑक्टोबरला रात्री नागरिकांच्या घरात घुसून पोलिसांनी  महिलांवर काठय़ा चालविल्याने त्या संतापल्या आहेत. मुळात ज्याचा खून झाला त्याच्या घरात पोलीस शिरलेच कसे, महिला आंदोलनात नसतानाही घरात शिरून त्यांच्यावर काठय़ांनी पोलिसांनी विशेषत: पुरुष पोलिसांनी मारहाण केलीच कशी, स्वत:च्या वाहनाची तोडफोड स्वत:च करायची व गुन्हा जमावाविरुद्ध दाखल कसा केला, आदी अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. पोलिसी लाठीमाराची सेवानिवृत्त न्यायाधीशांकरवी चौकशी व्हावी, अशी मागणी या परिसरातील महिलांनी केली.
जरीपटका परिसरात आज आता शांतता असली तरी नागरिक विशेषत: महिला भयभीत आहेत. महिला हिंसक कारवायात नव्हत्या. ज्यांच्याकडून संरक्षणाची अपेक्षा आहे त्या पोलिसांनीच घरात शिरून अपमानित करावे, ही सल या परिसरातील महिलांमध्ये आहे. लाठीमाराच्या वेदना अद्यापही त्यांच्या मनात कायम आहेत. अशा वेळी ‘सद््रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदाला जागून पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व निरीक्षक आदींसह सर्वच पोलिसांनी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याची व त्यांच्या मनातील भीती दूर करण्याची गरज आहे.

प्रामाणिक ‘पोलिसिंग’चीच गरज -आर्य
गुंडगिरी या परिसरात अनेक वर्षांपासून सुरू आहे. पोलिसांकडे तक्रारीही केल्या. परशू बुकी असल्याचे बोलले जात असले तरी तो गुंड नव्हता. त्याचा कुठलाही त्रास नव्हता. मात्र, त्याच्या खुनातील आरोपी गुंड प्रवृत्तीचे होते. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा केवळ देखावा केला. कारवाईच्या आड वसुली करत गुंडगिरीस खतपाणीच घातले. त्यातील एका आरोपीवर खुनाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्याला या परिसरात दुकानासाठी जागा देऊन एका राजकारण्याने त्याला पोसले. काही दिवसांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाने गुंडांच्या मदतीने जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मलमपट्टीशिवाय काहीही केले नाही. थातूरमातूर कारवाई करून उलट हप्ते वसुलीवर पोलिसांनी भर दिला व परिणामी गुंडगिरी फोफावली, असा आरोप नागरिकांनी केला. अद्यापही तसेच सुरू आहे. २३ तारखेला रात्री जरीपटका परिसरात तीन ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या. दहशत निर्माण करण्याच्या दृष्टीनेच या घटना घडल्या आहेत. निरीक्षकाची बदली केली गेली, हे चांगले पाऊल असले तरी तेवढय़ानेच संपले, असे नाही. गुंडगिरीला खतपाणी घालणे बंद करून ती मुळासकट संपवावी लागेल. त्यासाठी प्रामाणिक ‘पोलिसिंग’ची गरज अपेक्षित असल्याचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य म्हणाले.