आदिवासी व नक्षलवादग्रस्त भागात शासनाच्या योजना पोहोचत नाही. त्यामुळे या भागातील आदिवासी बांधव विविध योजनांपासून वंचित राहत असल्याची ओरड नेहमीच होत असते. मात्र, एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने मनात आणले तर आदिवासी व नक्षलवादग्रस्त भागातील युवकांना चांगला रोजगार प्राप्त होऊ शकतो. याचेच उदाहरण देवरी तालुक्यातील आदिवासी युवकांनी गवारीटोला गावाजवळ साकारलेल्या सेंद्रीय खत प्रकल्पावरून दिसून येत आहे.
जिल्ह्यातील नक्षलवादग्रस्त व आदिवासीबहुल देवरी तालुक्यातील पिपरखानी गावाजवळ गवारीटोला येथे युवकांनी एक गट तयार करून बेरोजगारीवर मात केली आहे. आदिवासी युवकांचा हा गट आता सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे व्यापारी बनला आहे. जंगलातील वन गौणउपज जमा करून त्यापासून सेंद्रीय खत तयार करण्याची कला आता या युवकांना अवगत झाली आहे. यातून या युवकांना स्वळबळावर उभे राहण्याची प्रेरणा मिळाली असून ते आता व्यापारी झाले आहेत. उन्हाळ्यात दररोज जंगलात पालापोचाळा वेचण्यासाठी दररोज या दहा तरुणांचा गट जातो. मात्र, हे वनविभागाचे कर्मचारी नाहीत, तर ते गवारीटोला या लहानशा खेडय़ातील आहेत. देवरी तालुक्याच्या अगदी शेवटी जंगलात वसलेले हे गाव आहे. जंगलातील पालापाचोळा जमा करून या युवकांना सेंद्रीय खत तयार करून स्वबळावर उभे राहण्याची प्रेरणा तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी दिली.
दररोज सकाळी असा पालापाचोळा जमा करून हे युवक गावात परततात. त्यानंतर सेंद्रीय खत तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू होते. सुरुवातीला या गावातील युवकांना रोजगार मिळत नव्हता. शिक्षणही जेमतेम झालेले, मात्र या सेंद्रिय खताच्या या प्रकल्पामुळे ते आज स्वत:च्या पायावर उभे आहेत. सेंद्रीय खत निर्मितीच्या प्रकल्पामुळे त्यांना गावातच चांगला रोजगार प्राप्त झाला आहे. त्यांना या कामासाठी स्थलांतर करण्याची आता गरजही भासत नाही. तसेच त्यांच्या उपक्रमाकडे गावातील अनेक तरुण आकर्षित होत आहेत. या आदिवासी युवकांचा गट आता आपल्या जंगलाच्या आधारावर चांगला व्यवसाय करीत आहेत. आदिवासी भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्याचा संकल्प तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी केला. त्यांच्याच संकलपनेतून सेंद्रीय खत तयार करण्याची सुरुवात गेल्या महिन्यापासून करण्यात आली आहे.
खत तयार करण्यासाठी जवळजवळ ९० दिवसांचा कालावधी लागतो. यासाठी केवळ ९० रुपयांचा खर्च येतो. तो देखील बॅक्टेरिया विकत घेण्याकरिता. मात्र, त्यांची ही गरजही कृषी विभाग भागवते. कृषी अधिकारी त्यांना बॅक्टेरिया उपलब्ध करून देतात. त्यामुळे या मुलांच्या गटाने सध्या सात क्विंटल खत तयार केले आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही या युवकांना मार्गदर्शन मिळत असल्यामुळे सेंद्रीय खत कसे तयार करायचे, याचे चांगले ज्ञानही त्यांना अवगत झाले आहे.
दरम्यान, आदिवासी व नक्षलवादग्रस्त भागातही अनेक रोजगाराच्या संधी प्राप्त होऊ शकतात. केवळ यासाठी मेहनत घेण्याची गरज आहे. जंगलातील पालापाचोळा गोळा करून त्यापासून सेंद्रीय खत तयार करून यातून या परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार प्राप्त होऊ शकतो, ही गोष्ट आपल्याला कळली. दहा युवकांचा एक गट तयार करून हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारला. यासाठी या युवकांनी भरपूर मेहनत घेतली असून त्याचेच फळ त्यांना आज मिळत असल्याचे देवरीचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी सांगितले.
ग्रामीण भागासाठी आदर्श
गावात उपलब्ध वस्तूंपासून सेंद्रीय खत तयार करण्याकरिता शेण, तणस, सदासावलीचा पाल्याची आवश्यकता असते. या सर्व गोष्टी गावातच सहज उपलब्ध होतात. केवळ सर्व गोष्टीची जमवाजमव करून त्यावर मेहनत करावी लागते. तसेच तयार करण्यात आलेले सेंद्रीय खत आपल्या शेतीतही वापरू शकतात.या खताची विक्री करून देण्याची शाश्वती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली असून आठ ते दहा रुपये किलोप्रमाणे या खताची विक्री करणार आहेत. आतापर्यंत सात हजार रुपयांचे खत तयार करण्यात आले आहे. यातून प्रत्येकी ७००० रुपयांचा रोजगार प्राप्त झाला असल्याचे सुरेश नरेटी, वासुदेव पुराम या युवकांनी सांगितले. देवरी तालुक्यातील बऱ्याच गावांना सामूहिक वनपट्टे देण्यात आले आहेत. एरवी जंगलात पालापाचोळा जमा होतो. उन्हाळ्यात वणवा लागून तो व जंगलातील जैवविविधताही नष्ट होते. मात्र, जंगलातील या वनउपजाचा योग्य वापर करून आपला व्यवसाय उभा करण्याची प्रेरणा तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी आदिवासी युवकांना दिली. त्यामुळे आता अन्य युवकांनीही यापासून आदर्श घ्यावा, असे गवारीटोलाचे माजी उपसरपंच लक्ष्मण नरेटी यांनी सांगितले.