बदलत्या मोसमाप्रमाणे अनेक व्यवसाय बदलत असतात. चोरांचेसुद्धा खास मोसम असतात. तर काही चोरांचा ‘सण’ हाच खास मोसम असतो. सणासुदीच्या काळातच चोरांची टोळी सक्रीय होते. दिवाळी, गणपती, नवरात्री असे उत्सव या चोरांसाठी पर्वणी असते. नुकत्याच संपलेल्या गणेशोत्सवाच्या सणात चोरांच्या टोळ्या सक्रीय झाल्या होत्या. पोलिसांनी काही टोळ्यांना अटक केल्यानंतर या ‘फेस्टिव्हल चोरां’ची अनोखी पद्धत समोर आली.
मुंबईचा गणेशोत्सव यंदा गाजला तो गर्दीत महिलांशी होणाऱ्या गैरवर्तनामुळे. पण मुंबईत अनेक ठिकाणी याच गर्दीचा फायदा घेऊन चोरांच्या टोळ्या भाविकांचे मोबाईल, सोनसाखळ्या तसेच पाकीटमारी करत होते. पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवून काही टोळ्यांना जेरबंद केले. त्यापैकी काही टोळ्या तर या अन्य राज्यांतून खास याच कामासाठी आल्या होत्या.
‘लालबागचा राजा’तले चोर
लालबागचा राजा हा मुंबईतल्या सर्वात मोठे गर्दीचे ठिकाण. लाखो भाविक रोज येथे येतात. विसर्जनाच्या दिवशी तर अलोट गर्दी होत असते. त्याचा फायदा घेत चोर ‘हात की सफाई’ करत असतात. काळाचौकी पोलिसांनी अशा चोरांना पकडण्यासाठी दोन पथके बनवली होती. प्रत्येक पथकात एक अधिकारी आणि चार पोलिसांचा समावेश होता. या पथकाने संशयितांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. या काळात त्यांनी अडीचशेहून अधिक संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यात चोरांच्या चार टोळ्या समोर आल्या. या टोळ्या कर्नाटक, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश तसेच मुंब्रा आणि नांदेड येथून आल्या होत्या. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून सोनसाखळ्या, रोख रक्कम आणि चोरलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही टोळी एवढी सराईत असते की गर्दीत आपला मोबाईल अथवा गळ्यातील दागिना काढला गेला तरी बराच वेळ ते लक्षातही येत नाही.
‘खानदानी’ चोर
शिवाजी पार्क पोलिसांनीही मध्यप्रदेशातल्या खांडवा जिल्ह्य़ातील राठोड टोळीला अटक केली आहे. संपूर्ण राठोड कुटुंबच या टोळीत सहभागी होते. या टोळीच्या कार्यपद्धतीबाबत परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की ही ‘फेस्टिव्हल चोरां’ची टोळी आहे. ती केवळ सणासुदीलाच मुंबईला येते. राठोड कुटुंबाचे अनेक सदस्य चोरीचे ‘काम’ करतात. ते गणेशोत्सवापूर्वी खारघर येथे उतरले होते. सकाळी लोकलने दादर परिसरात यायचे आणि गर्दीत मिसळून ‘हात की सफाई’ दाखवायचे. सोनसाखळ्या आणि मोबाईल लंपास करण्यात त्यांचा हातखंडा होता. गणेशोत्सवाचे दहा दिवस त्यांच्यासाठी सुगीचा काळ. नंतर ते पुन्हा आपल्या गावी परतून पुन्हा नवरात्रोत्सवात येणार होते. परंतु शिवाजी पार्क पोलिसांनी या टोळीला पकडून त्यांच्याकडून चोरलेले १९ मोबाईल जप्त केले.