विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या काँग्रेसच्या मोर्चाला ५० हजारांपेक्षा जास्त शेतकरी आणि कार्यकर्ते राहील, अशी घोषणा केली असताना प्रत्यक्षात मात्र दोन ते अडीच हजार नागरिक उपस्थित होते. त्यात विविध जिल्ह्य़ातील नेत्यांची संख्या जास्त असून कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची संख्या मात्र फारच कमी होती. काँग्रेसचा मोर्चा असल्यामुळे पोलिसांनी मोर्चास्थळी कडक बंदोबस्त ठेवला असताना मोर्चातील लोकांपेक्षा सुरक्षेला असलेल्या पोलिसांची संख्या जास्त असल्याचे बोलले जात होते.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज देण्यात यावे व राज्यात दलितांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्याच्या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसतर्फे दीक्षाभूमीवरून सकाळी ११ वाजता विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार होता. त्यामुळे सकाळपासून विविध जिल्ह्य़ातील शेतकरी आणि कार्यकर्ते येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, दुपारी १ वाजेपर्यंत हजार लोक उपस्थित नव्हते, मात्र जसजशी वेळ होत गेली तसे एक एक करीत विविध जिल्ह्य़ातून कार्यकर्ते, शेतकरी वाहनाने येऊ लागले. मोर्चाला पाहिजे त्या प्रमाणात गर्दी होत नसल्याचे लक्षात येताच दुपारी १.५० वाजता दीक्षाभूमीवरून मोर्चाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, भाई जगताप, आमदार रणजित कांबळे, अविनाश वारजूरकर, सचिन सावंत, अनिस अहमद, डॉ. नितीन राऊत आदी नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. दीक्षाभूमीवरून निघालेला मोर्चा काचीपुरा चौक रामदासपेठ, पं. जवाहरलाल नेहरू मार्गे, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक मार्गे टी पॉईंटवर मोर्चा अडविण्यात आला. मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाल्यानंतर यावेळी पक्षाच्या नेत्यांची भाषणे झाली. यावेळी विविध नेत्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशी मागणी करीत भाजप-शिवसेनेचा नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. काँग्रेसचे निलंबित आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात आर्वीमधून काढण्यात आलेली शेतकरी दिंडी दुपारी नागपुरात पोहोचल्यावर त्यातील शेतकरी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. मोर्चाच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसने गेल्या महिन्याभरापासून तयारी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी गावोगावी बैठका घेतल्या होत्या. प्रत्येक नेत्यांना आणि प्रमुख कार्यकर्त्यांंना गर्दी जमविण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी गर्दी जमविली नसल्याचे दिसून आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकऱ्यांची अवस्था फारच गंभीर आहे. कापूस, धान, उसाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक परिस्थितीने खंगला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज देण्याच्या व राज्यातील वाढत्या दलित अत्याचार रोखण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला आहे. गावोगावी आवाहन केले होते. मात्र, शेतकरी आर्थिक चणचणीत असल्यामुळे ते येऊ शकले नाही. मोर्चाला गर्दी नाही, असे म्हणता येणार नाही. बाहेरगावातील शेतकरी वेळेपर्यंत पोहचू शकले नाही, असे सांगून त्यांनी सारवासारव केली.