समाज व्यवस्थेच्या सुरक्षेकरिता लैंगिक अत्याचाराच्या विरोधी लढय़ाची गरज असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी केले. स्थानिक सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशलवर्क व सरस्वती शिक्षण महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादाचे उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, अ‍ॅड. विजया बांगडे, डॉ. प्रगती नरखेडकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी डॉ. निर्मला सामंत प्रभावळकर म्हणाल्या, लैंगिक छळविरोधी कायद्याच्या सर्व माध्यमातून स्तरावरून लढा उभारण्याची गरज आहे. हा लढा अधिक तीव्र करण्याकरिता मोठय़ा पदावरील व्यक्तींकडून गुन्हा होत असेल तर त्याला त्वरित शिक्षा होणे गरजेचे आहे व त्याकरिता व्यावसायिक समाजकार्याच्या शिक्षणाद्वारे प्रयत्नाची अपेक्षा आहे. हे प्रयत्न होण्याकरिता शांताराम पोटदुखे यांनी समाजकार्य महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. या महाविद्यालयाने २५ व्या वर्षांत पदार्पण करून संबंधित विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादाचे आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षक म्हणून गौरविलेले प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल व या चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. या चर्चासत्राच्या अध्यक्षीय स्थानावरून शांताराम पोटदुखे बोलताना म्हणाले, समाजकार्य महाविद्यालयातून अशा चर्चासत्राचे आयोजन होणे हे समाजहिताचे असून रौप्य महोत्सवी वर्षांत डॉ. निर्मला सामंत प्रभावळकरांसारख्या व्यक्तीमत्त्वाने मार्गदर्शन करणे  हा   दुग्धशर्करा   योग   आहे.  हे महाविद्यालय उत्तरोत्तर प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला.
प्राचार्य डॉ. सुनील साकुरे व चर्चासत्राच्या समन्वयक डॉ. प्रगती नरखेडकर यांनी वरील चर्चासत्राकरिता घेतलेले परिश्रम प्रशंसनीय असून, ते अभिनंदनास पात्र असल्याचे म्हटले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. जयश्री कापसे यांनी केले, तर आभार प्रा. विश्वनाथ राठोड यांनी मानले. कार्यक्रमाला संशोधनकर्ते, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी, महिला व बालविकास प्रकल्पाचे अधिकारी, पत्रकार व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.