पालिकेच्या चार क्रमांकाच्या प्रभागातील एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसचा माजी आमदार जयंत ससाणे यांचे चिरंजीव करण ससाणे यांना उमेदवारी देण्याचा विचार आहे. ससाणे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत येणार आहे.
पालिकेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र गुलाटी हे १२९ मताने विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे पवार यांचा पराभव केला होता. गुलाटी यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढविली म्हणून पवार यांनी आक्षेप घेतला होता. जातपडताळणी समितीने गुलाटी यांचा जातीचा दाखला रद्द ठरविला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना नगरसेवकपदी अपात्र ठरविण्यात आले. आता या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे.
निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार दि. २७ ते दि. ४ या कालावधीत उमेदवारीअर्ज दाखल करावयाचे असून, माघार दि. ११ रोजी आहे. निवडणूक दि. २७ ऑक्टोबर रोजी होत आहे. निवडणुकीत ७ हजार ९९५ मतदार असून सव्वातीन वर्षांसाठी निवडणूक होत आहे. या प्रभागात संजयनगर, फातिमा व मिल्लत हौसिंग सोसायटी, ईदगाह परिसर, गुरुनानकनगर, पंजाबी कॉलनी, आदर्शनगर, नेहरूनगर झोपडपट्टी, काझीबाबा रोड, बागवान मोहल्ला, सुखदा व वृंदावन सोसायटी, गोपीनाथनगर हा भाग येतो.
माजी आमदार ससाणे यांचे चिरंजीव करण हे गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय झाले आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना संधी देण्यात आली. पोटनिवडणुकीमुळे पालिकेच्या राजकारणात प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ससाणे यांच्या पत्नी राजश्री या नगराध्यक्ष आहेत. पूर्वी ससाणे यांनी पालिकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. नगराध्यक्षपदही भूषविले. आता पालिकेत स्वत:चे चिरंजीव करण यांना पाठवण्याचा त्यांचा विचार आहे. पोटनिवडणुकीसाठी संजयनगर भागात गेल्या एक महिन्यापासून विकासकामे त्यांनी सुरू केली आहेत. ससाणे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत येणार आहे.