मराठवाडय़ाला जायकवाडीचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्य़ातील पुढारी आडकाठी आणत असतील तर मराठवाडय़ाची जनताही आता पाण्यासाठी संघर्षांच्या पवित्र्यात आहे. येत्या ३० ऑक्टोबरला औरंगाबादेत या लढाईला प्रारंभ होत असल्याचे भाजपाचे प्रवक्ते माजी आमदार विजय गव्हाणे यांनी स्पष्ट केले.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत गव्हाणे म्हणाले की, गोदावरी ही मराठवाडय़ाची जीवनदायिनी आहे. गोदावरीच्या पाण्यावर सर्वाधिक हक्क हा मराठवाडय़ाचा आहे. सन १९८०मध्ये झालेल्या पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडीसाठी ११० टीएमसी पाण्याचा कोटा राखीव आहे. सन २००५च्या जलप्राधिकरणाच्या कायद्यानुसार राज्यातील सर्व धरणांत समान पाणीवाटप होणे आवश्यक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत व पाकिस्तानातून वाहणाऱ्या मोठय़ा नद्यांचे पाण्याबाबतचे करारही पाळले जातात. पण मराठवाडय़ावर मात्र नगर-नाशिक हे जिल्हे अन्याय करीत आहेत.
मराठवाडा हा महाराष्ट्राचा भाग आहे की नाही हे तरी एकदाचे ठरवून टाका, असेही गव्हाणे म्हणाले.
जायकवाडीच्या पाण्यासाठी भाजप संघर्षांची भूमिका घेत असून ३० ऑक्टोबरला मराठवाडा सांस्कृतिक मैदानावरून या संघर्षांची सुरुवात होत आहे. मराठवाडय़ातील जनता या दिवशी मोठय़ा संख्येने एकत्र येऊन पाणीप्रश्नावर आपला तीव्र संघर्ष प्रगट करणार आहे.
गोदावरीच्या पात्रात ११ बंधारे बांधण्याचा दावा करणाऱ्या अजित पवार यांनी पाचच वर्षांत बंधाऱ्यांच्या किमती दहा पटीत वाढवल्या, हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या घातलेला दरोडा आहे, असेही गव्हाणे म्हणाले.
नगर जिल्ह्य़ातली साखर कारखानदारी वाचविण्यासाठी मराठवाडय़ाला तहानलेले ठेवण्याचा कुटिल डाव जनता मोडून टाकण्याच्या मन:स्थितीत आहे. पाण्याच्या प्रश्नावर पेटलेली जनता आता उग्र अशा संघर्षांच्या माध्यमातून नगर जिल्ह्य़ातल्या दोन्ही काँग्रेसच्या नेतृत्वाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असेही गव्हाणे म्हणाले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, जि. प. सभापती गणेश रोकडे, व्यंकट तांदळे, शहराध्यक्ष अजय गव्हाणे आदी उपस्थित होते.