जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड संपर्कमंत्री सुनील तटकरे यांच्या नांदेड दौऱ्याच्या वेळी शनिवारी शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत हाणामारी झाली. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या हाणामारीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
तटकरे यांचे विमानतळावर शनिवारी दुपारी आगमन झाले. त्यानंतर त्यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहावर आले. धर्माबाद, देगलूर, हदगाव व अन्य भागातील कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. कार्यकर्त्यांना उद्देशून तटकरे यांनी भाषण केले व नंतर विष्णुपुरी प्रकल्पाला भेट दिली. दरम्यानच्या काळात तटकरे विश्रामगृहावरून जाताच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष फेरोज लाला व अन्य कार्यकर्त्यांनी विश्रामगृहावरच जयराम मोरे यांना मारहाण केली. या प्रकारानंतर फेरोज लालासह आनंद पाटील, माधव पावडे, दादाराव पुयड यांची सूर्यकांता पाटील गटाचे सुशील जाधव, वसंत सुगावे, जयराम मोरे, धम्मपाल धुताडे यांच्याशी विश्रामगृह परिसरातच झटापट झाली. पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांनी या दोन गटांमधील भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला न जुमानता या दोन्ही गटांत हाणामारी झाली. या वेळी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी या निमित्ताने रस्त्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.