शहर पोलीस ठाण्यात दोघा पोलीस कर्मचाऱ्यांमध्येच हाणामारी झाली. पूर्वी गुन्हे शाखेत असलेल्या पोलिसाने वाहतूक शाखेतील एका पोलिसाला धक्का लागल्याचे निमित्त करून चांगलाच चोप दिला. सायंकाळी या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला होता. मात्र अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दुपारी शहर पोलीस ठाण्यात एका पोलिसाला दुसऱ्या पोलिसाचा धक्का लागल्याचे निमित्त झाले. त्यातून पोलिसाने दुसऱ्या पोलिसाच्या श्रीमुखात ठेवून दिली. एवढय़ावरच तो थांबला नाही. त्याने चांगलीच धुलाई केली. उपस्थित अन्य पोलिसांनी भांडण मिटवले. पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी दोघांना बोलावून घेतले. मार बसलेल्या पोलिसाने फिर्याद नोंदवावी असा आग्रह धरला. मात्र परस्परविरोधी फिर्यादी दाखल करून घेतल्या जातील, असे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगून भांडण मिटविले.
साळुंके-ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेचा अहवाल मागवला आहे. गोपनीय अहवाल आल्यानंतर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. ज्या पोलीस कर्मचाऱ्याने धक्का लागल्याचे निमित्त करून मारहाण केली. तो अनेक वर्षांपासून शहर पोलीस ठाण्यात गुन्हे पथकात कार्यरत आहे. तक्रारी आल्यानंतर त्यास पथकातून काढून टाकण्यात आले. शहरातील अवैध व्यवसायाशी त्याचे लागेबांधे आहे. चिरीमिरी जमा करण्याचे काम तोच करतो. त्यामुळे काही अधिकाऱ्यांचा तो लाडका आहे. त्या जोरावरच त्याने हे धाडस केल्याचे समजते.