घरावरून झालेल्या वादातून मारामारी होऊन दोन गटांनी छावणी पोलिसात परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही बाजूंकडील तेराजणांविरुद्ध गुन्ह्य़ाची नोंद केली.
यातील पहिली फिर्याद कडू जनार्दन कीर्तीकर (वय २८, माळीवाडा, औरंगाबाद) याने दिली. आरोपी मनोज शिरसाठ याने फिर्यादीचे घर कायदेशीर करण्यासाठी फिर्यादीकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. परंतु फिर्यादीने खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी मनोज, तसेच राधाकिसन शिरसाठ, केशव राधाकिसन शिरसाठ, अरुण मथुरादास वैष्णव, बाळू विश्वनाथ हेकडे, मनोजची आई व पत्नी या सातजणांनी शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कीर्तीकर याला मारहाण केली. मनोज याने कीर्तीकर यांच्या डाव्या डोळ्यावर फायटरने मारून जखमी केले, तसेच राधाकिसन याने काठीने, तर अन्य आरोपींनी लाथाबुक्क्य़ांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मनोज शिरसाठ (वय २७, रा. माळीवाडा) याने दुसरी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, सरपंच जगन्नाथ भगत, उपसरपंच कडू जनार्दन कीर्तीकर, कचरू कीर्तीकर, कडू कीर्तीकरची पत्नी व मावशी, गणेश भैरव (सर्व माळीवाडा) यांनी संगनमत करून ‘तू व अरुण वैष्णव माळीवाडा ग्रामपंचायत विरुद्ध जिल्हा परिषद या प्रकरणात माझी तक्रार का केली’ या कारणावरून दरवाजास लाथा मारून घरात घुसून आपण व आपल्या साथीदारास लाथाबुक्क्य़ांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.