नगर-मनमाड रस्त्यावरील देहरे (ता. नगर) येथील टोल नाक्यावर बनावट पावत्यांच्या सहायाने बनावट सरकारी कागदपत्रे तयार करुन लाखो रुपयांचा अपहार केला तसेच सरकारची व लोकांचीही फसवणूक केल्याच्या आरोपावरुन टोलवसुली करणाऱ्या मे. सुप्रीम कोपरगाव टोलवेज प्रा. लि. कंपनी व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी श्री. अभिजीत भगवान खोसे (रा. बुरुडगाव रस्ता, नगर) यांनी येथील न्यायालयात दावा दाखल केला आहे.
खोसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस आहेत, अ‍ॅड. प्रसन्ना जोशी यांच्यामार्फत त्यांनी हा दावा दाखल केला आहे. भादवि ३९५, ४१९, ४२०, ४६३, ४७३, ४७४, ४६७ व ४६८ प्रमाणे कंपनीचा व्यवस्थापक, कंपनीच्या वतीने टोलवसुली करणारे राज सिक्युरिटी अँड अलाईड सव्‍‌र्हिसेस (नगर) व कंपनीचा टोल कर्मचारी शेख शरीफ बसीर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. देहरे टोल नाक्यावरील बेकायदा टोलवसुलीच्या विरोधात खोसे यांनी आंदोलन केले होते, या आंदेलनाच्या वेळी उघड झालेल्या बनावट पावती प्रकरणाबाबत तक्रार करुनही पोलिसांनी दखल न घेतल्याने न्यायालयात दाद मागत असल्याचे दाव्यात नमूद करण्यात आले आहे.
दाव्याची सुनावणी दि. १४ फेब्रुवारीस ठेवण्यात आली आहे. दाव्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व कनिष्ठ उपअभियंत्यांची साक्ष नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. कंपनीने बीओटी तत्वावर नगर-मनमाड रस्त्याचे काम केले आहे, नियमानुसार कंपनीने या महामार्गाची देखभालव डागडुजी करणे अपेक्षित आहे. कंपनी हे काम योग्य पद्धतीने करत नसल्याची आपण सरकारकडे तक्रार केली, त्याची चौकशी करण्यासाठी विभागाच्या अधिका-यांचे पथक तयार करण्यात आले, या पथकाने ९ नोव्हेंबर २०१३ रोजी देहरे टोलनाक्याची पाहणी केली असता, टोल नाक्यावर ग्राहकांना बनावट पावत्या दिल्या जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले, यासंदर्भात आपण एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली परंतु त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे खोसे यांच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.