येथील शाहू स्मारक भवनमध्ये २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान ‘वुई केअर फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पवन खेबूडकर, दिलीप बापट व पी. डी. देशपांडे यांनी येथे दिली.
    या महोत्सवाचे आयोजन येथील मतिमंदत्वाच्या क्षेत्रात गेली २७ वर्षे कार्यरत असलेली चेतना अपंगमतीविकास संस्था, हेल्पर्स ऑफ हॅण्डिकॅप्ड व बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी या तीन संस्था संयुक्तपणे करीतआहेत.
    वुई केअर फिल्म फेस्टिव्हलचे स्वरूप केवळ मनोरंजनात्मक, कलात्मक किंवा उपदेशपर असे नाही.तर शैक्षणिक व सामाजिक जाणीव प्रगल्भ करणे व या विषयाचे भान सर्वदूर पोहोचविणे हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे. वुई केअरकडे आजअखेर सुमारे ४५०च्या वर लघुपट-माहितीपटांचा खजिना असून १ मिनिटापासून ६० मिनिटांपर्यंतच्या फिल्म्स त्यात आहेत. यातील निवडक लघुपटांचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश करण्यात येणार असून, सहा पूर्ण लांबीचे चित्रपट या काळात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
या महोत्सवात महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, शिक्षक, या क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते आदींनी यात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. महोत्सवाचे शैक्षणिक, समाजिक स्वरूप लक्षात घेता प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. मात्र नियोजनाकरिता बराच खर्च अपेक्षित असून रसिकांनी या उपक्रमासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या प्रवेशासाठी नावनोंदणी आवश्यक असून दि.१५ फेब्रुवारीपासून कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी, चेतना विकास मंदिर व हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड या ठिकाणी नोंदणी करावी.