समजा एखाद्या दिवशी तुमच्या आवडत्या चित्रपटामधील दिवाणखान्याचा सेट जसाच्या तसा तुमच्या दिवाणखान्यात हजर झाला तर? लवकरच, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकते. मराठी चित्रपटांसाठी काम करणाऱ्या सेट डिझाइनर सुमित पाटील याने ही किमया साधली आहे. चित्रपटाच्या कथानकात जीव ओतण्याचे काम ती कथा ज्या जागी घडताना आपल्याला दिसते ती जागा आणि तेथील बारीकसारीक वस्तूंचे तपशील करत असतात. चित्रपटाच्या भाषेत याला सेट म्हणतात. चित्रपटात पाहिलेले टेबल-खुर्ची, भिंतीवरचे एखादे पेंटिंग नाहीतर दिवाणखान्याच्या कोपऱ्यात उभे असलेले एखादे शिल्प अशा गोष्टी तुमच्या घरीच उपलब्ध करून देण्याची एक अभिनव संकल्पना सुमित राबवणार आहे. यासाठी त्याने डिझाईन केलेल्या सेटचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
कुठल्याही चित्रपटाचे चित्रिकरण संपल्यानंतर मागे उरलेल्या सेटचे पुढे काय होते? चित्रिकरणानंतर सेट आणि टेबल, खुर्चीसकट सर्व सामान एकतर निर्मात्याकडे जमा होते नाहीतर नंतर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये गरजेनुसार ते वापरले जाते. पडद्यावर दिसणाऱ्या या सेट्सना प्रेक्षकांच्या घरी स्थान मिळाले तर? या विचाराने सुमितने आपण मराठी चित्रपटांसाठी डिझाईन केलेल्या सेट्सचे प्रदर्शन आणि विक्री करण्याचे ठरवले आहे.
याआधी काही नाटके  आणि ‘काळा घोडा कला महोत्सवा’तून सेट डिझाइनिंग करण्याचा अनुभव गाठीशी असणाऱ्या सुमितने पाच आगामी मराठी चित्रपटांसाठी सेट डिझाइनिंग केले आहे. यामध्ये ‘चुकभूल द्यावी घ्यावी’, ‘एलबीडब्ल्यू’, ‘योगी’, ‘एक होता काऊ’, ‘पोरबझार’ या चित्रपटांचा समावेश आहे.
 विशेष म्हणजे यावेळी त्याच त्याच भाडय़ाच्या वस्तू आणण्याऐवजी त्याने चित्रपटाच्या प्रसंगानुरूप चित्रे, शिल्पाकृती बनवलेल्या आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या सेटमधील काही निवडक वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करणार असल्याची माहिती सुमितने ‘वृत्तान्त’ला दिली. चित्रिकरणानंतर सर्व सामान निर्मात्याकडे जमा होत असल्याने त्याचा वापर इतर चित्रपटांमध्ये करण्यात येतो.
यात गैर काही नसले तरी त्याच वस्तू वापरल्यामुळे तोचतोचपणा येतो, असे सुमितचे म्हणणे आहे. हे टाळण्यासाठी चित्रपट प्रदर्शित  होण्याआधीच प्रदर्शनाच्या माध्यमातून त्या सेट्समधील काही खास वस्तुंची विक्री करणार असल्याचे त्याने सांगितले.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपलीकला लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळेल आणि या कलाकृती आपण स्वखर्चाने तयार केलेल्या असल्याने त्याच्यावर आपलाच मालकी हक्क असल्याचा दावाही सुमितने केला आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून चित्रपटांचा पहिला लूक लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न सुमित करणार असल्याने निर्मात्यांनीही या अनोख्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे, लवकरच चित्रपटांतील असाच एखादा तुमच्याही दिवाणखान्यात सजवण्याची संधी तुम्हाला मिळेल.