एका खंडणीखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी अगदी ‘फिल्मी’ पद्धतीने सापळा रचला. त्यासाठी पथकातील अधिकाऱ्यांना फेरीवाले, रिक्षाचालकांची भूमिका वठवावी लागली. पथकाचा सापळा यशस्वी ठरला आणि थेट पाकिस्तानातून खंडणीसाठी फोन करणारा आरोपी ताब्यात आला.
मुंबई उपनगरातील एका व्यापाऱ्याला काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्याने स्वत:चे नाव अफजल खान असल्याचे सांगत दहा लाखांची खंडणी मागितली. थेट पाकिस्तानातून दूरध्वनी आल्याने हा व्यापारी पुरता हादरला होता. त्यानंतर दुबईतून सना नावाच्या महिलेचाही दूरध्वनीआला. मी अफजल खानच्या टोळीतील सदस्य असून मुंबईतील साथीदाराकडे दहा लाख रुपये दे. पोलिसांकडे तक्रार केल्यास गंभीर परिणाम होतील, असा दमच या दोघांनी या व्यापाऱ्याला दिला होता. पाकिस्तान आणि दुबईतून येणारे दूरध्वनी, त्यांना आपल्याबद्दल असलेली खडान्खडा माहिती यामुळे हा व्यापारी घाबरला. पण त्याने धीर एकवटून मुंबई गुन्हे शाखेशी संपर्क साधला. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त सदानंद दाते, अतिरिक्त आयुक्त निकेत कौशिक यांनी हे प्रकरण संवेदनशील असल्याने खंडणीविरोधी पथकाकडे सोपवले. पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वत्स यांनी व्यापाऱ्याचे दूरध्वनी टॅप केल्यावर ते पाकिस्तान आणि दुबईमधूनच येत असल्याचे उघड झाले.
आरोपींना पकडणे मोठे आव्हान होते. पोलिसांनी एक योजना आखली. त्यानुसार या व्यापाऱ्याने तीन लाख रुपये देण्यास तयार असल्याचे अफजलला सांगितले. विलेपार्ले येथील आपल्या साथीदाराकडे पैसे देण्याची सूचना अफझलने व्यापाऱ्याला केली. परदेशातून खंडणीसाठी येणारे दूरध्वनी आणि मुंबईत सक्रीय असलेली त्यांची टोळी, हे पाहता हे प्रकरण गंभीर होते. पैसे घेण्यासाठी येणाऱ्या आरोपीला पकडणे सोपे नव्हते. त्यामुळे खंडणी विरोधी पथकातील पोलिसांनी अगदी ‘फिल्मी’ पद्धतीने सापळा रचला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सकपाळ, पोलीस उपनिरीक्षक बांगर, चौधरी, महाडिक, महेश साळुंखे आदींनी विलेपार्ले येथील ठरलेल्या जागी वेषांतर करून पाळत ठेवली. काही जण रिक्षाचालक, तर काही जण फेरीवाले बनले. अफजलचा साथीदार पैसे घेण्यासाठी येताच पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली.
..व्यापारी बनला खंडणीखोर
अटक केलेल्या आरोपीचे नाव हितेन मेहता (३५) असून तो व्यापारी आहे. हॉटेल्स आणि रुग्णालयांना चादरी, टेबल क्लॉथ पुरविण्याचा त्याचा व्यवसाय होता. ए अ‍ॅण्ड ए मेहता लिनेन्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाची त्याची कंपनी होती. व्यवसायानिमित्त काही काळ तो दुबईत होता. मात्र व्यवसायात नुकसान झाल्याने त्याने इतर व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळण्याची योजना आखली. त्यासाठी दुबईमध्ये ओळख झालेल्या सनाला त्याने हाताशी धरले. पाकिस्तानमधील अफजल खान हा सनाच्या परिचयाचा होता. या तिघांनी पाकिस्तान आणि दुबईतून खंडणीसाठी फोन करायला सुरुवात केली. अफजल खान आणि सना सध्या फरार आहेत. यापूर्वी त्याने याच पद्धतीने कुणाकडून खंडणी उकळली आहे का? तसेच व्यापाऱ्यांची माहिती ते कसे मिळवायचे? याचा तपास सुरू असल्याचो विनायक वत्स यांनी सांगितले.