भारत प्रतिभूती मुद्रणालयास आलेल्या निनावी धमकीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेला गोरेवाडी ते नाशिकरोड रस्ता अखेर संबंधित विभागाने स्थानिक पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने खा. समीर भुजबळ यांना लेखी उत्तरात दिली आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे हे एक महत्त्वाचे केंद्र असल्यामुळे त्याची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे देण्यात आली आहे. निनावी धमकीनंतर संबंधितांनी सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेऊन पोलिसांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर गोरेवाडी ते नाशिकरोड यादरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे गोरेवाडी व मळे विभागातील सुमारे ३० हजार लोकांना ये-जा करण्यासाठी तीन ते चार किलोमीटरचा फेरा घालावा लागू लागला. मुद्रणालयाच्या व्यवस्थापनाबद्दल त्यामुळे प्रचंड असंतोष स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाला. त्यांनी खासदारांसमोर हा विषय मांडला. त्याची दखल घेत खासदारांनी भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे महाव्यवस्थापक टी. आर. गौड यांच्यासमवेत मागील आठवडय़ात प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून नागरिकांना होत असलेला त्रास त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. स्थानिकांची सुरक्षा तपासणी करून या मार्गाने जाऊ देण्यात येण्याची  विनंती खा. भुजबळ यांनी महाव्यवस्थापकांना केली होती. त्यानंतर हंगामी स्वरूपात महाव्यवस्थापकांनी हा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय कधीही मागे घेतला जाऊन पूर्वपरिस्थिती पुन्हा येईल अशी भीती नागरिकांमध्ये होती. मात्र पादचाऱ्यांना आता कायमस्वरूपी दिलासा मिळाला आहे. या मार्गाला पर्यायी मार्ग काढून अथवा वाहनांची तपासणी करून त्यांनाही या मार्गावरून जाऊ देण्यासाठी या पुढील काळात प्रयत्न केला जाईल असे आश्वासन खा. भुजबळ यांनी दिले.