महिन्याभराच्या मेहनतीनंतर पहिल्या तारखेला मिळणाऱ्या वेतनाची लेखी कोणतीच माहिती न मिळणाऱ्या मुंबईतील शिक्षकांना आता दिलासा मिळाला आहे. कारण शिक्षकांना दरमहा पगाराची ‘स्लिप’ (पावती) देण्याचे आदेश मुंबईतील शिक्षण निरीक्षकांनी शाळांना दिले आहेत.

शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे दरमहा मिळणाऱ्या वेतनाची व भत्त्याची माहिती मिळणे हा त्यांचा अधिकार आहे; परंतु कित्येकदा शिक्षकांनी मागणी करूनही त्यांना वेतनाची पावती दिली जात नसे. शिक्षकांचे वेतन थेट बँकेत जमा केले जात असल्याने दर महिन्याचे वेतन, ग्रेड पे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि अन्य भत्ते याबाबतची माहिती मिळण्यास काहीच वाव नव्हता. वेळोवेळी महागाई भत्त्यात होणारी वाढ व त्या अनुषंगाने त्यांच्या पगारात झालेली वाढ त्यांना माहीत होणे आवश्यक आहे. तसेच जुलै महिन्यात सर्व शिक्षक व शिक्षकेतरांना वार्षिक वेतनवाढ देय आहे. दर वर्षांला वेतनवाढ दिली किंवा नाही, असल्यास किती, याची माहिती मिळण्याचा काहीच मार्ग नव्हता.

शिक्षक-शिक्षकेतरांच्या वेतनातून वेगवेगळ्या कारणांसाठी हप्ता कापला जातो. त्यामध्ये पतसंस्थेचे हप्ते, बँकेचे कर्ज, भविष्य निर्वाह निधी याकरिता नेमके किती पैसे कापले गेले ही माहिती मिळण्याचाही काही मार्ग नव्हता. अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करून वेतनातून कपात केली जाते. वेतनातून किती कपात झाली व कोणकोणत्या कारणास्तव कपात करण्यात आली याची माहिती शाळेकडून मिळत नाही. काही वेळा वैयक्तिक व अन्य कामांसाठी वेतन दाखला मागितला जातो;

परंतु अनेक शाळांकडून वेतन दाखला देण्यास टाळाटाळ केली जात होती. परंतु आता दरमहा वेतनाची स्लिप मिळणार असल्याने शिक्षकांचे हे सर्व प्रश्न सुटणार आहेत, अशी प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी व्यक्त केली.बोरनारे यांनी १ जुलै २०१५ रोजी वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षकांनाही या प्रश्नाबाबत पत्र लिहिले होते. त्याची दखल अधीक्षकांनी व निरीक्षकांनी घेऊन पगाराची पावती देण्याचे आदेश शाळांना दिले आहेत.

 

..तरीही शाळांची टाळाटाळ

शालार्थ प्रणालीअंतर्गत आता शाळांमधील सर्व कर्मचाऱ्यांची वेतन देयके पारित होतात. या प्रणालीअंतर्गत कर्मचाऱ्यांची वेतन पावती उपलब्ध होते. त्यामुळे शाळांनादेखील पे स्लिप देणे सोपे झाले आहे, तरीही शाळा ती देण्यास टाळाटाळ करीत होत्या.

– अनिल बोरनारे