शिवसंघ प्रतिष्ठानच्या अंदमान अभिवादन यात्रा उपक्रमातंर्गत ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांसाठी शेकडो जणांनी आगाऊ नोंदणी केली असताना गो एअर या कंपनीने अचानक अंदमानची विमान सेवा रद्द करून किंगफिशर कंपनीकडे नोंदणी वर्ग केली. परंतु अंतर्गत समस्येचे कारण पुढे करत किंगफिशरने विमान फेरी रद्द केल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार प्रतिष्ठानच्या नाशिक विभागीय कार्यालयाने केली आहे. नोंदणीसाठी दिलेली रक्कम परत करण्याप्रकरणी गो एअर व किंगफिशर या कंपन्यांनी हात झटकल्याने प्रतिष्ठानने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने सिलीकॉन एव्हीएशनच्या माध्यमातून काही वर्षांपासून स्वा. सावरकर अभिवादन यात्रा हा उपक्रम सुरू आहे. दरवर्षी दीड ते दोन हजार सावरकरप्रेमींना या उपक्रमातंर्गत अंदमानला नेण्यात येते. ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१२ या महिन्यांसाठीही दिडशे नागरिकांनी गो एअर या कंपनीच्या विमानांची आगाऊ नोंदणी केली होती, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कॅप्टन नीलेश गायकवाड व सचिव प्रमोद गायकवाड यांनी दिली. या यात्रेकरूंचे चेन्नई ते पोर्टब्लेअर अशी नोंदणी करण्यात आली होती. प्रत्येकी ३० यात्रेकरूंच्या ऑक्टोबरमधील पाच फेऱ्या यानुसार १५० यात्रेकरूंची नोंदणी झाली. त्यानुसार या यात्रेकरूंचे पुणे ते चेन्नईपर्यंतची रेल्वे नोंदणी, चेन्नईतील एक दिवसाचा मुक्काम, हॉटेल नोंदणी, सहा दिवसांचे पोर्टब्लेअरमधील निवास, फिरण्यासाठी वाहन नोंदणी, भोजन व्यवस्था, परतीचे चेन्नई ते पुणे रेल्वे तिकीट, इत्यादी सर्व व्यवस्था त्यात होती. परंतु गो एअरने त्यांच्या काही अडचणींमुळे विमानफेऱ्या रद्द केल्या. प्रतिष्ठानला संपूर्ण नोंदणीची रक्कम परत करण्याची तयारी दर्शविली. तथापि, प्रतिष्ठानने पर्यायी व्यवस्थेची मागणी केली. गो एअरने सर्व १५० प्रवाशांची नोंदणी  किंगफिशर विमानसेवा कंपनीकडे हस्तांतरीत केली. परंतु काही दिवसात अंतर्गत समस्यांचे कारण देत किंगफिशरने चेन्नई ते पोर्टब्लेअर विमानसेवा अचानक बंद करीत आमच्या १५० प्रवाशांनाही अडचणीत आणले, अशी तक्रार गायकवाड यांनी केली आहे.
किंगफिशरकडून नोंदणीचे १८ लाख रूपये परत मिळावेत, यासाठी पत्राद्वारे, मेलद्वारे मागणी करूनही कंपनीने दाद दिली नाही. कायदेशीर नोटीस पाठवूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. याप्रकरणी लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा प्रतिष्ठनने दिला आहे.