एलबीटीबाबत व्यापाऱ्यांना राज्यातील आघाडी सरकार झुलवत ठेवत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विश्व ग्रुपच्या वतीने हॉटेल ग्रँड येथे व्यापाऱ्यांसोबत आयोजित चहापान कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बसवराज वळसंगे, विश्व ग्रुपचे गुरुनाथ मगे, भूषण दाते, सुनील देशपांडे याप्रसंगी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, की देशात कुठेही एलबीटी कर नाही. तो केवळ महाराष्ट्रात आहे. भाजप-शिवसेनेचे सरकार असताना राज्यातील नगरपालिकांचा जकात कर रद्द करण्याची भूमिका आम्ही घेतली होती. जगात सर्वाधिक करांचे किचकट धोरण भारतात आहे. महापालिकांना स्वायत्त करण्याच्या नादात नवे कर लावून ग्राहकांची कुचंबणा व व्यापाऱ्यांची कोंडी केली जाते. रोज नवे कर लागू केल्याने व्यापाऱ्यांनी व्यवसाय करायचा की कारकुनी? असा प्रश्न उपस्थित करून फडणवीस म्हणाले, की एलबीटीऐवजी व्हॅट करात वाढ केली तर व्यापारी पसे भरण्यास कुरकुर करणार नाहीत. जो काही सरकारला कर घ्यायचा आहे तो एकदाच घेतला की होणारा त्रास कमी होईल. मुख्यमंत्री आपली भूमिका लोकांनी ऐकलीच पाहिजे, अशा वृत्तीने वागत आहेत. वेळ काढला की लोक प्रश्न विसरून निमूटपणे सरकारची आज्ञा पाळतील, अशी त्यांची भूमिका असावी. एलबीटीसंबंधी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या अडचणींवर कशी मात करता येईल, यासंबंधी लेखी उपाय आपण सरकारला कळविले होते. मात्र, मुख्यमंत्री निर्णय घेत नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यानंतर एलबीटी रद्द केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशात १९९०सारखी आíथक स्थिती तयार झाली आहे. सोने गहाण ठेवल्याशिवाय देश चालवणे अवघड होणार आहे. सन २००४मध्ये वाजपेयी सरकारने भक्कम आíथक स्थितीवर देश नेऊन ठेवला होता. गेल्या १० वर्षांत सर्वच पातळीवर देश आíथक अडचणीत आला आहे. देशात साधनसामग्रीची नाही तर कणखर नेतृत्वाची कमी आहे. नरेंद्र मोदींसारख्या क्षमतावान नेतृत्वाची देशाला गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. गुरुनाथ मगे, संभाजी पाटील निलंगेकर, बसवराज वळसंगे, प्रवीण सावंत यांची भाषणे झाली.
लातूरकरांची फसवणूक- वळसंगे
महापालिका निवडणुकीपूर्वी आम्ही सत्तेत आल्यास लातूरकरांवर कोणताही नवा कर लावला जाणार नाही. एलबीटीची कोणीही भीती बाळगू नये, असे आश्वासन दिलेल्या काँग्रेसच्या हाती लातूरकरांनी महापालिकेची एकहाती सत्ता दिली. परंतु निवडून आल्यानंतर आपणच दिलेल्या आश्वासनाला सत्ताधाऱ्यांनी हरताळ फासला. लातूरकरांची ही घोर फसवणूक आहे, या शब्दांत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बसवराज वळसंगे यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला.