डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा भागात एका अनधिकृत इमारतीसाठी गेल्या आठ महिन्यांपासून चोरून पाणी वापरणारा विकासक विलास म्हात्रे याच्याविरुद्ध पालिकेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.देवीचा पाडा भागात पांडुरंग आर्केड ही अनधिकृत इमारत विकासक विलास म्हात्रे यांनी बांधली आहे. या अनधिकृत इमारतीला पालिका नळजोडणी मंजूर करीत नसल्याने म्हात्रे यांनी चोरून नळजोडणी घेतली होती. गेल्या वर्षी ऑगस्टपासून ते आतापर्यंत ८४० घनमीटर पाणी चोरून वापरून म्हात्रे यांनी पालिकेचे पाच हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. पालिकेच्या ह प्रभागाचे अधीक्षक अनिरुद्ध सराफ यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीत मोठय़ा प्रमाणात चोरून नळजोडण्या घेण्यात आल्या आहेत. नव्याने अनधिकृत बांधकामे करून या बांधकामांसाठी पालिकेच्या जलवाहिन्यांवरून पाणीपुरवठा घेतला जात आहे. त्यामुळे अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पालिकेचे प्रभाग क्षेत्र अधिकारी याविषयी मूग गिळून असल्याने नागरिक पाणीटंचाईने बेजार आहेत.