भर रस्त्यावर फटाके विक्री अत्यंत धोकादायक असल्याने मीरा-भाईंदर शहरात रस्त्यांवर फटाके विक्री करण्यास आयुक्त विक्रम कुमार यांनी बंदी घातली असून, सुरक्षित असे सात फटाके विक्री झोन आखून दिले आहेत. रस्त्यावर फटाके विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
नेताजी सुभाषचंद्र मैदान, उड्डाणपुलाखालील समांतर रस्ता, नवघर शाखेचे मैदान, जेसल पार्क येथील मैदान, शांतीनगरमधील मैदान पय्याडे हॉटेलमागील मैदान, तसेच कनकिया मार्गावरील आरक्षित जागेत फटाके विक्रीचे सात झोन आखून देण्यात आले आहेत. फटाके विक्रीसाठी अग्निशमन दल, तसेच पालिकेचा परवाना बंधनकारक करण्यात आला आहे, असे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगितले. दरम्यान, नागरीवस्त्यांत फटाकेविक्री चांगली होत असल्याने मनाई आदेश रद्द करण्याची मागणी विक्रेत्यांनी केली आहे.