जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत कक्षात शुक्रवारी आग लागली. वातानुकूलितयंत्रणेमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. आगीमुळे धुराचे लोट पसरल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर धूरकट बनला होता. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.    
जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातून धूर येत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी सावधगिरी दाखवत आतील फर्निचर, कागदपत्रे आदी साहित्य कार्यालयाच्या बाहेर आणून ठेवले. उपलब्ध अग्निशामक साधनांच्या प्रयत्नाने आग शमविण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कामानिमित्त बाहेर असल्याने कार्यालयातील वर्दळ कमी होती. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना पुरेसा अवधी मिळाला.     
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाडय़ा व १२ जवान तातडीने दाखल झाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत प्रवेश करून पाण्याचा मारा सुरू केला. आगीमुळे धुराचे लोट पसरल्यामुळे आग विझविण्याच्या कामात अडथळे येत होते. थोडय़ाच वेळात आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. वातानुकूलित यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हाधिकारी राजाराम माने, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी आगीची पाहणी केली.
 दिव्याखाली अंधार
मंत्रालयाला आग लागल्यानंतर शासनाने सर्व शासकीय आस्थापनांना फायर ऑडिट करून घेण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हय़ातील सर्व आस्थापनांना याबाबतची कृती करण्यास सांगितले होते. स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयाने फायर ऑडिट केले होते. त्यातील त्रुटीही निदर्शनास आल्या होत्या. मात्र त्याची पूर्तता केली नव्हती. परिणामी, आज जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच आगीचा प्रकार घडल्याने दिव्याखालीच अंधार कसा आहे, याचे दर्शन घडले.