सिडकोच्या बेलापूर येथील मुख्यालयातील तळमजल्यावर असणाऱ्या उपाहारगृहात बुधवारी सकाळी अचानक आग लागल्याने नुकत्याच हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्यात चांगलीच तारांबळ उडाली होती. सिडकोच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी काही क्षणात मुख्यालय सोडले होते. नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्धा तासात ही आग आटोक्यात आणली. उपाहारगृहातील सिलेंडरच्या गळतीमुळे ही आग लागल्याचे नंतर स्पष्ट झाले मात्र उपाहारगृहाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सिडकोच्या उपाहारगृहातील एका कोपऱ्यात अनेक गॅस सिलेंडरांचा साठा केलेला असतो. मध्यंतरी सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव व व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी या उपाहारगृहाची पाहणी केली होती. तरीही स्वयंपाकघरातील सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्वयंपाक बनविणाऱ्या आचाऱ्याने काडपेटी पेटवली असताना भडका उडाला. सिलेंडरमधून गळती होत असल्याने ही आग लागली. सिडकोत आग लागल्याचे बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने सिडको काही मिनिटांत खाली करण्यात आली. उपाहारगृहातील फायर सिस्टिमद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग संपूर्ण विझवली.