भंडारा मार्गावरील कापसी खुर्द भागातील एका सॉ मिलला बुधवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत कोटय़वधी रुपयांचे लाकूड जळून राख झाले. यात व्यापाऱ्याचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन विभागाच्या जवळपास बारा गाडय़ा आणि टँकर्स घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी दुपापर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत कुठलीही जीवहानी झाली नाही.
कापसी खुर्द परिसरात फ्रेंड्स टिंबर मार्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ही सॉ मिल व लाकडाची वखार आहे. सागवान व इतर लाकडांचे मोठे ओंडके तसेच विविध आकारात कापलेल्या पट्टय़ा मोठय़ा प्रमाणात ठेवण्यात आले होते. विस्तीर्ण लोखंडी टिनाच्या शेडखाली सॉ मिल असून त्यात लाकूड कापण्याचे यंत्र तसेच लाकडे ठेवण्यात आली होती. पहाटे अडीच वाजताच्या सुमारास या ठिकाणी आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीत गोदामातील भुसा असलेली पोती पेटली. लाकूड असल्याने तसेच पहाटेच्या वाऱ्याने आग अधिक भडकली. त्यानंतर ती इतरत्र पसरली. संपूर्ण सॉ मिल आणि वखार आगीच्या विळख्यात सापडले. आगीच्या ज्वाळा आकाशाकडे झेपावू लागल्या. पहाटेच्या अंधारतही आकाशात काळा धूर झाला होता.
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या कळमना केंद्रातून गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, आग इतरत्र पसरत असल्याचे बघता शहरातील लकडगंज, कळमना, सक्करदरा, गंजीपेठ, कॉटन मार्केट, सिव्हिल लाईन्स या अग्निशामक दलाच्या केंद्रातून गाडय़ा बोलविण्यात आल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. आगीचे रौद्र रूप बघता  एमआयडीसी अग्निशामक दलाच्या गाडय़ाही घटनास्थळी बोलविण्यात आल्या. आगीची घटना परिसरात कळताच सकाळीनंतर मोठय़ा प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती. कंपनीचे संचालकही तेथे पोहोचले होते. मिल रात्री बंद असल्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. परिसरात नागरिकांची मोठय़ा प्रमाणात बघणाऱ्यांची गर्दी झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त परिसरात वाढविण्यात आला होता.
आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विस्तीर्ण आवारात पसरलेल्या लाकडांना आग लागली. आगीत लोखंडी टिनांच्या शेडच्या आधाराचे लाकडी खांबही जळाले. त्यामुळे टिनाची पत्रे आगीत सापडली आणि वितळू लागली. चारही बाजूने पाण्याचा मारा केला जात होता. मात्र आग भीषण असल्याने अग्निशमन दलाचा आग विझविण्याचा प्रयत्न त्यापुढे तोकडा ठरत होता. सकाळनंतर दोन जेसीबी बोलावण्यात आले. दुपापर्यंत अग्निशमन दलाच्या आणखी गाडय़ा मागविण्यात आल्या. लकडगंजमधून  पाण्याचे टँकर मागविण्यात आले. त्यातूनही मधून पाण्याचा मारा केला जात होता. अग्निशमन दलाच्या बारा गाडय़ांमधून पन्नासहून अधिक कर्मचारी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. दुपापर्यंत बारा गाडय़ांच्या पाणी आणण्यासाठी प्रत्येकी दहा फेऱ्या झाल्या होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत बऱ्याच प्रमाणात आग आटोक्यात आली असली तरी ती विझली मात्र नव्हती. वखारीच्या विस्तीर्ण परिसरात कोळशाचा ढिगारा तयार झाला होता आणि आत आग धुमसत असल्याने धूर निघत होता.  फ्रेंड्स टिंबर मार्ट प्रायव्हेट
लिमिटेड कंपनीने या सॉ मिल व वखार परिसरात अग्निशमन यंत्रणा उभारली नसल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांपासून लपून राहिले नाही. किंबहुना कंपनीने ही यंत्रणा न उभारताच तसेच अग्निशमन दलाची परवानगी न घेता वखार व सॉ मिल सुरू केली. अग्निशमन दलाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले नसल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. आग कशाने लागली, हे स्पष्ट झालेले नव्हते.

अयोध्यानगरात सिलिंडरचा स्फोट
अयोध्यानगरातील एका घरात काल मध्यरात्रीच्या सुमारास आग लागून सिलिंडरचा स्फोट झाला. आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले. एक निरपराध ससा मात्र आगीत मरण पावला. अयोध्यानगरातील श्रीरामवाडीत विजय चरपे हे पत्नी व दोन मुलींसह राहतात. ते घाट मार्गावरील एका खासगी कंपनीत कामगार आहे. त्यांची पत्नी नंदा गृहरक्षक दलात आहे. काल रात्री विजय चरपे कामावर गेले होते. पत्नी व दोन मुली घरी झोपले होते. मध्यरात्री घराला अचानक आग लागली. सुदैवाने नंदाला जाग आली. आग लागल्याचे दिसताच तिने तातडीने दोन्ही मुलींना झोपेतून जागे केले आणि त्या तिघी घराबाहेर पडल्या. त्याक्षणीच घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. या आवाजाने परिसर हादरला. परिसरातील लोक दचकून जागे झाले. कशाचा आवाज आहे हे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या लोकांना चरपेंच्या घरात आग लागलेली दिसली. नागरिकांची धावाधाव झाली. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी अग्निशमन दलाला कळविले. काही मिनिटात सक्करदरामधून अग्निशमन दलाची गाडी तेथे पोहोचली. आगीवर पाण्याचा मारा करून त्यांनी तासाभरात आग विझविली. मात्र, आगीत घरातील कपडे, गाद्या व कागदपत्रे जळून खाक झाली. दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजरेटर, पंख्याचे पत्रे, भांडी तसेच खुच्र्याचे लोखंड आगीच्या उष्णतेमुळे वाकून काळी ठिक्कर पडली. आग वेगाने पसरल्याने त्यात घरात पाळलेला ससा मरण पावला. आगीत या कुटुंबाचे सर्वस्वच नष्ट झाल्याने हे कुटुंब उघडय़ावर आले. शेजाऱ्यांनी त्यांना आसरा दिला. मुलींची शालेय पुस्तके, वह्य़ांसह सर्व साहित्य आगीत भस्मसात झाले.