प्रत्यक्ष खरेदीसोबतच आवडत्या व्यक्तींसह वीकेण्डला विंडोशॉपिंगसाठी, वेळ घालवण्यासाठी मुंबईकरांची पावले आपसूकच वातानुकूलित शॉपिंग मॉलकडे वळतात. मात्र एकाच वेळी हजाराहून अधिक ग्राहक एकवटलेले हे मॉल प्रत्यक्षात लाखमहाल असल्याचे पाहणीत आढळून येत आहे. पालिका आयुक्तांच्या सूचनेवरून अग्निशमन दलाने सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ११ मॉलची झडती घेण्यात आली असून महत्त्वाचे म्हणजे यातील एकाही मॉलमध्ये अग्निसुरक्षेची योग्य तरतूद नाही.
मॉलमधील सुरक्षाव्यवस्थेमधील त्रुटी समोर आल्यानंतर शहरातील या नव्या पर्यटनस्थळांमधील अग्निशमन यंत्रणेबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शहरातील जुन्या लाकडी बांधकामाच्या इमारती तसेच उंच इमारतींमधील आगीच्या वाढत्या घटनांसोबतच २१ जुलै रोजी वांद्रे येथे केनिलवर्थ शॉपिंग मॉलला लागलेली आग पालिकेसाठी डोकेदुखी वाढवणारी ठरली. ही आग वेळीच आटोक्यात आणली गेली, मात्र त्यानिमित्ताने आतापर्यंत सामान्यांना माहिती असलेली मॉलमधील अनधिकृत बांधकामांची माहिती पालिकेच्या लेखी अधिकृतपणे समोर आली.
पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सर्वच मॉलमधील अग्निसुरक्षेची पाहणी करण्याच्या सूचना दिल्यानंतर गेल्या पंधरा दिवसात सांताक्रूझ – वांद्रे या भागातील ११ मॉल्सची पाहणी करण्यात आली. पाहणीचा वेग कमी असला तरी या पाहणीतून समोर आलेले वास्तव अधिक भीषण आहे. पाहणी केलेल्या एकाही मॉलमध्ये अग्निसुरक्षेसाठी योग्य यंत्रणा कार्यान्वित नव्हती. अनधिकृत बांधकामांनी आगीसारख्या घटनेत आवश्यक असलेली मोकळी जागा गिळंकृत केली होती.
एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष आगीशी लढण्यासाठी आवश्यक असलेले स्प्रिंकलर्स, लघु अग्निशमन यंत्र, वाळूच्या बादल्या यांचीही व्यवस्था नव्हती. आग प्रतिबंधक योजना नसली तरी आगीला कारणीभूत ठरणाऱ्या ज्वलनशील पदार्थाचा अनधिकृत साठा मात्र अनेक मॉलमध्ये आढळला. आता या सर्व मॉलना नोटीस देण्यात आली आहे.
‘गेल्या पंधरा दिवसात शहरातील विविध भागातील ११ मॉलची तपासणी करण्यात आली. एकाही मॉलमध्ये अग्निसुरक्षा नियमांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झालेली नाही. त्यामुळे सर्व मॉल्सना ३० दिवसांची नोटीस बजावण्यात आली आहे. या काळात त्यांनी योग्य ते बदल केले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’ असे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी सांगितले.

पाहणी केलेले मॉल्स
श्रीजी प्लाझा- झेन ऑर्केड, खार
लिंग कॉर्नर मॉल, खार
क्रिस्टल शॉपर्स पॅराडाइड मॉल, खार
लिंक स्क्वेअर मॉल, वांद्रे
न्यु ब्युटी सेंटर, वांद्रे
केनिलवर्थ मॉल, वांद्रे
हायलाइफ मॉल, सांताक्रूझ
रिलायन्स हायपर मॉल, सांताक्रूझ
मच्छीवाला बिल्िंडग, सांताक्रूझ
आढळलेल्या अनियमितता
अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा अभाव
इमारतींमध्ये लघु अग्निशमन यंत्र (पोर्टेबल फायर एक्स्टिग्युशर) व वाळूने भरलेल्या बादल्या नव्हत्या
आगीवर पाणी फवारण्यासाठी आवश्यक िस्पक्रलर सिस्टीम कार्यान्वित नव्हती
तळघरांमध्ये व इतर ठिकाणी ज्वलनशील वस्तूंचा साठा
माहितीदर्शक फलक नव्हते
विद्युत नियमन यंत्रणेला
(ईलेक्ट्रीक शाफ्ट) सील नव्हते.
फायर अलार्म यंत्रणा कार्यान्वित नव्हती
वायूविजन यंत्रणा तसेच खिडक्या बंद करण्यात आल्याचे आढळून आले
वायूविजनासाठी आवश्यक असलेल्या यंत्राकरीता (एअर हॅण्डिलग युनिट), जनित्रासाठी (जनरेटर) तसेच इलेक्ट्रीक मीटरच्या जागेत अनधिकृत बांधकाम
हवा खेळती राहण्यासाठी असलेली मोकळी जागा, उद्वाहन जवळील परिसर आणि सार्वजनिक मोकळ्या जागांवरही बांधकाम
मंजूर आराखडयातील जिने बांधले नसल्याचे आढळून आले.