मोटारसायकलवर आलेल्या आरोपींनी देशी कट्टय़ातून गोळीबार करीत एका खाणावळ मालकास जखमी केले. सोमवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास  काटोल मार्गावरील फ्रेण्ड्स कॉलनी परिसरात ही थरारक घटना घडली. एक आरोपी तासाभरातच पोलिसांच्या हाती लागला दुसऱ्या आरोपी फरार आहे.
उमेश यदुनाथ पांडे (रा. बुटीबोरी) हे जखमीचे नाव आहे. बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना तो जेवणाचे डबे पोहोचवतो. त्याचे सुरेंद्रगडमध्ये घर असून ते सध्या भाडय़ाने दिले आहे. त्याचा मेव्हणा महेश चौबे (रा. दयालनगर वर्धा) याच्यासह हिरो होंडा पॅशनवर (एमएच/३१/बी झेड/९८४०) तो कॉटन मार्केटमध्ये भाजी घ्यायला सकाळी आला. भाजी घेऊन तो सुरेंद्रगडमध्ये गेला. तेथून भाडेकरुकडून भाडे घेऊन ते दोघेही बुटीबोरीला जायला निघाले. स्मशान घाटाजवळून वळण घेत ते सुरेंद्रगडकडे जात होते. मागून वेगात हिरो होंडा पॅशनवर (एमएच/३१/डी डब्ल्यू/७७६९) आली आणि त्यांच्यासमोर आडवी उभी झाली. उमेशने गाडी थांबवली. त्यावर मागे बसलेल्या एका आरोपीने उमेशच्या दिशेने गोळी झाडली. ती उमेशच्या डाव्या दंडाला चाटून गेली. त्याबरोबर उमेश गाडीवरून खाली उतरला. धावत जाऊन गोळी झाडणाऱ्यावर झेपावला आणि शस्त्र असलेला हात धरून त्याला जोरात खेचले. त्यामुळे दोघेही आरोपी खाली पडले. उमेश आरोपींसह झटापट करीत असतानाच दोघेही आरोपी स्वत:ची सुटका करून घेत सुरेंद्रगडकडे धावत सुटले.
गोळी झाडल्याचा आवाज ऐकून रस्त्याने जाणारे वाहन चालक धास्तावले. पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळाल्यानंतर नियंत्रण कक्षाने गिट्टीखदान पोलिसांना सूचना देत घटनास्थळाकडे रवाना केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बोंडे यांच्यासह गिट्टीखदान पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी तातडीने जखमी उमेश पांडेला मेयो रुग्णालयात रवाना केले. तोपर्यंत तेथे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्त मंगलजित सिरम, गुन्हे शाखेचे प्रमुख उपायुक्त सुनील कोल्हे, सहायक पोलीस आयुक्त प्रताप धरमसी, पोलीस निरीक्षक माधव गिरी यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक आले. जखमी उमेश पांडे याने कुणाल शर्मा (रा. सुरेंद्रगड) या गाडी चालवित असलेल्या आरोपीचे नाव सांगितले. पोलिसांच्या पथकांनी तातडीने त्याचा शोध सुरू केला. सुरेंद्रगडमधील घरून तो पळून जात असतानाच पोलिसांच्या हाती लागला. घटनास्थळावर पडलेली आरोपींची गाडी तसेच देशी कट्टा जप्त केला. त्यात एक गोळी होती. कुणालचा साथीदार व ज्याने प्रत्यक्ष कट्टय़ातून गोळी झाडली त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला.  
कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याची पोलिसांच्या प्राथमिक माहिती आहे. काही दिवसांपूर्वी उमेशने आरोपी कुणाल याला मारहाण केली होती. मात्र, गोळीबार करण्यामागे निश्चितच मोठे कारण असावे, अशी पोलिसांची शंका आहे. आरोपी कुणाल याने घटनेच्या काही मिनिटांपूर्वी उमेशचा ठावठिकाणा घेतला होता. उमेश सुरेंद्रगडमधून निघाल्याची माहिती कुणालने घेतली होती. ती त्याने ज्याच्याकडून घेतली त्याचेही नाव पोलिसांना समजले. देशी कट्टा बाळगणारा आरोपी गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.