थंडीचे दिवस.. डोक्यावर असलेले छप्पर आगीने हिरावून घेतले.. त्यामुळे राहायला जागा नाही.. मुलाबाळांना भूक लागली आहे, पण अन्न शिजवायला धान्य व भांडे शिल्लक नाही. अंगावर घालायला पुरेस कपडे नाहीत. घरातील सर्व सामान जळून खाक झाले असले तरी कुठे न जळलेली वस्तू दिसते का त्याचा शोध आगग्रस्त घेत आहेत. आमचे घर गेले, सामान गेले, अशा परिस्थितीत आम्ही कुणाकडे न्याय मागावा असा सवाल करीत झोपडपट्टीतील आबालवृद्ध डोळ्यात आसू आणून व्यथा लोकांसमोर मांडत आहे.
भंडारा मार्गावरील महालगाव आसोली गट ग्रामपंचायतीच्या झुडपी जमिनीवर वसलेल्या बावनकुळेनगर झोपडपट्टीला गुरुवारी दुपारी भीषण आग लागून ३२ झोपडय़ा व त्यातील वस्तू जळून खाक झाल्या. नागपूरच्या सीमेवरील महालगाव परिसरात असलेल्या विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांसाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नाने ही झोपडपट्टी काही वर्षांपूर्वी वसली होती. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास अचानक एका झोपडीला आग लागली. बांबूचे तट्टे, लाकडी खांब असल्याने आग भडकली आणि त्यात परिसरातील सर्व झोपडय़ा जळून खाक झाल्या आणि शेकडो कामगार आणि मजुरांचे जीवन उद्ध्वस्त झाले. आज दुसऱ्या दिवशी या भागात फेरफटका मारला असता झोपडपट्टीतील अनेक महिला व पुरूष जळलेले सामानाची विल्हेवाट लावत होते. या झोपडपट्टीमध्ये कळमना बाजारपेठ मोलमजुरी करणारे आणि वीट भट्टय़ा आणि इतर ठिकाणी मोलमजुरी करणारे मजूर राहत आहेत. दिवसभर मोलमजुरी करून सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व कामगार घराकडे परततात. अनेक कामगार रोजच्याप्रमाणे आजही मोलमजुरीसाठी सकाळीच घराबाहेर पडले होते. लहान मुलांसह काही आबालवृद्ध छोटय़ाशा झोपडीत होते. दुपारी १२ वाजताची वेळ असल्यामुळे महिला कामात व्यग्र होत्या. अनेकांची मुले शाळेत गेली होती. अचानक लागलेल्या आगीमुळे सगळे झोपडीच्या बाहेर आले. बहुतेकांच्या घरातील सर्व सामान जळून खाक झाले.
आगग्रस्त नागरिकांची निवासाची व्यवस्था आसोली ग्राम पंचायतमध्ये करण्यात आली. आसोलीचे गावकरी तसेच हल्दीराम कंपनीतर्फे यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. आगीने खाक झालेल्या झोपडय़ांकडे पाहात शुक्रवारी दिवसभर झोपडपट्टीत राहणारे घरातील काही सामान शिल्लक आहे का, याचा शोध घेत होते. झोपडपट्टीत राहणाऱ्या महिला चुलीवर चहा व नास्ता करून देतात.  आज लहान मुलांची भूक शमविण्यासाठी घरात अन्नाचा कण नव्हता. लहान मुलांच्या अंगावर कपडे नव्हते. आमदार चंद्रशेखर बावनकुठे यांनी लोकांसाठी मदतीचा हात पुढे करून त्यांना दिलासा दिला असला तरी तेवढी मदत पुरेशी नव्हती. सर्व कामगारांची घरे, वस्तू, पैसा सगळे उद्ध्वस्त झाले. काही महिलांच्या डोळ्यात अश्रू होते. या झोपडपट्टीत जवळपास ३७ कुटुंबे राहात असून प्रत्येक कुटुंबात किमान ४ ते ५ जण आहेत.