दीपावलीत फटाक्यांची आतषबाजी होणे यात विशेष काही नाही. परंतु दीपावलीनंतर येणाऱ्या तुळशी विवाहाच्या दिवसाची सायंकाळ आणि रात्र सटाणा तालुक्यातील मुल्हेरसाठी निश्चितच विशेष होय. या सायंकाळी व रात्री येथे रथोत्सव काढण्यात येऊन फटाक्यांची जबरदस्त आतषबाजी करण्यात आली. या आतषबाजीचे वैशिष्टय़े म्हणजे गल्लीप्रमाणे घरांमध्ये अगदी कोणाच्याही पायांजवळ फटाके फोडले गेले. मुल्हेरमध्ये कित्येक वर्षांपासून आतषबाजीची ही परंपरा सुरू असून यंदाही उत्साह व आनंदात मुल्हेरकरांनी हा उत्सव साजरा केला.
कोजागिरी पौर्णिमेला होणाऱ्या अनोख्या रासक्रिडा उत्सवासाठी प्रसिध्द असलेल्या सटाणा तालुक्यातील मुल्हेर येथे तुळशी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांजवळ फटाके फोडण्याची रोमहर्षक आणि थरारक परंपरेच्या स्वरूपात आजही कायम आहे. शुक्रवारी रात्री उत्साहात या उत्सवाचा आनंद परिसरातील ग्रामस्थांनी घेतला. सकाळी उध्दव महाराजांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी एक वाजेच्या सुमारास हा रथ महाराजांच्या समाधीस्थानाजवळ परतला. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास राधा-कृष्ण, उजव्या सोंडेचा गणपती असलेल्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. रस्त्यावर ठिकठिकाणी कुकूंमार्जन..रांगोळ्या..फुलांच्या पायघडय़ा घालण्यात आल्या होत्या. एकापेक्षा एक सुरेख रांगोळ्या काढण्याची जणूकाही स्पर्धाच लागली होती. श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांच्या नावे सुरू असलेला नामघोष एकीकडे सुरू होता. या यात्रेचे वैशिष्टय़ेा म्हणजे रथयात्रा आणि यात्रेत सामील झालेल्या भक्तगणांच्या शरीराजवळ टाकण्यात येणाऱ्या पेटत्या फटाक्यांच्या लडी.
साधारणत साडेतीनशे वर्षांपासून उध्दव महाराजांच्या काळापासून देवदिवाळी हा उत्सव मुल्हेर येथे साजरा करण्यात येतो. कार्तीक शुध्द एकादशीपासून उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरूवात होते. यावेळी एकादशीला देवांचे ‘उत्थापन’ म्हणजे त्यांना हलविण्यात येते. या दिवसाचे औचित्य साधत उध्दव महाराजांच्या घरापासून रथयात्रा काढण्यात येत असे. उध्दव महाराजांच्या निर्वाणानंतर उत्सवाचे स्वरूप बदलले. एकादशीच्या दिवशी निघणारा रथ उध्दव महाराजांच्या महानिर्वाण दिनाला म्हणजे त्रयोदशीला काढण्यात येऊ लागला. मात्र द्वादशीला तुळशीविवाह नियमितपणे होत आहे. यंदाही शुक्रवारी सकाळी सहा वाजता उध्दव महाराजांच्या घरापासून रथयात्रेस सुरूवात झाली. रथाच्या मानकऱ्यांमध्ये विविध जातींच्या ग्रामस्थांचा समावेश आहे. रथाच्या मार्गावर फुलांच्या पायघडय़ापासून फटाक्यांची आतीशबाजी करण्यात आली. रध उध्दव महाराजांच्या समाधी स्थळांपर्यत आल्यानंतर त्याचे पूजन करण्यात आले. आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करून रथयात्रेचा समारेप झाला.सायंकाळी राधा-कृष्ण, विष्णू आणि उजव्या सोंडेचा गणपती यांच्या मूर्ती विराजमान असलेल्या रथाची मिरवणूक सुरू झाली. या रथयात्रेचे वेगळेपण म्हणजे रथाचे स्वागत करण्यासाठी फुलांसोबत पेटत्या फटाक्यांची उधळण करण्यात आली. रथाचे ज्या ज्या ठिकाणी पूजन होते त्यांसह रथाचे सारथ्य करणाऱ्यांच्या, आदरतीथ्य करणाऱ्या घरांमध्येही फटाके फेकले जात होते. यासंदर्भात बोलताना किशोर पंडित यांनी प्रारंभी रथापुढे दिव्यांसह रोषणाई करण्याची प्रथा होती असे नमूद केले. कालांतराने या रोषणाईसाठी फटाक्यांचा आधार घेतला जाऊ लागला. चेष्टामस्करीच्या स्वरूपात एकमेकांजवळ फटाके फोडण्यास सुरूवात झाली आणि पुढे हीच प्रथा बनली, असे पंडित यांनी नमूद केले.